Breaking News
recent

मलकापूरनजीक टिप्पर-आयशरची धडक; ३ ठार, १ गंभीर

 


    मलकापूरनजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आज (रविवारी) टिप्पर व आयशरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडानजीक असलेल्या नदीच्या पुलावर विटांनी भरलेले आयशर (क्र.एमएच ४८ जे ००६१) वाहन मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून मलकापूरकडे येत होते. दुसरीकडे, महामार्गाच्या चौपदरीकरणकरिता माती घेऊन कल्याण टोल प्रा.लि.चे टिप्पर (क्र. एमएच ४६ एएफ २७८२) हे मालवाहू वाहन मलकापूरकडे येत होते. या दोन्ही वाहनांची भरवेगात जबर धडक झाली. यात मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील राजू रतन चव्हाण (३७), जीवन सुरेश राठोड (२७) व सुनील ओंकार राठोड (३३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राम मलखंब राठोड (२६) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धडक इतकी भीषण होती की, आयशरच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर टिप्पर चालक वाहन सोडून पळाला. मलकापूर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.

Powered by Blogger.