तुपकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केल्याप्रकरणी न्यायालीन कोठडीत असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात १३ फेब्रुवारी रोजी जामीन अर्ज सादर करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने तो दाखल करून घेत १४ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे वादी आणि प्रतिवादी पक्षातर्फे १४ फेब्रुवारीला होणाऱ्या युक्तिवादानंतर नेमका काय निर्णय होतो, याकडे सध्या लक्ष लागून आहे.
शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आल्यावर रविकांत तुपकर व २४ आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आले होते. बहुतांश गुन्हे हे अजामीनपात्र आहेत. आंदोलनानंतर रविवारी बुलढाणा न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील खन्ना यांनी तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी • देण्याची मागणी केली होती. तुपकर व अन्य व्यक्तींच्या वतीने बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय हिम्मतराव सावळे व अॅड. शर्वरी तुपकर यांनी युक्तिवाद केला होता. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायाधीशांनी तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे तुपकरांसह उर्वरित २४ जणांना अकोला कारागृहात रविवारी सायंकाळी हलविण्यात आले होते.
दुसरीकडे सोमवारी रविकांत तुपकर व अन्य २४ जणांच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. अॅड. विजय सावळे आणि अॅड. शर्वरी तुपकर यांनी अर्जात आरोप फेटाळून लावले. सरकार व प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊनच आंदोलन करण्यात आले. ते रस्त्यावर करण्यात आल्याने शासकीय कामात अडथळा (लम३५३) चा प्रश्नच येत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. आंदोलकांनी 'बॅरिकेड्स' तोडले आणि दगडफेक केल्याचाही इन्कारही करण्यात आल्याचे अॅड. सावळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.