राजूर घाटात बस पलटी; ८ प्रवाशी जखमी
मोताळा बुलढाणा येथून जामनेरकडे प्रवाशी घेवून जाणाऱ्या बसचे राजूर घाटामध्ये ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगवधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बस पलटी झाल्याने बसमधील ८ प्रवाशी जखमी झाले. सदर घटना आज गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास देवीच्या मंदीरासमोरच्या वळणावर घडली.जामनेर डेपोची एम. एच. ४० एन-९०९७ ही बस चालक लोखंडे बुलढाणा येथून घेऊन निघाले होते, त्यामध्ये २९ प्रवाशी होते.
राजूर घाटात देवीच्या मंदीरापूढील वळणार बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक लोखंडे यांच्या लक्षात आले. यावेळी लोखंडे यांनी दरीकडे वळत असलेली बस पहाडाकडे वळविल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु बस पलटी झाल्याने बसमधील गंगाराम सुखदेव वाघ (वय ८४ ) सौ. लताबाई गावंडे (वय ३५), अरुण वाघ (वय ५२), इंदुबाई वाघ ( वय ४५) सर्व रा. दे. गुजरी ता. जामनेर, श्रीकृष्ण जाधव (वय ७५) रा. नांद्रा हवेली ता. जामनेर, मधूकर जाधव (वय ७६) रा. लोणी ता. जामनेर, शेषमन राठोड (वय ६६) रा. घाणेगाव ता. सोयगाव, अशोक पाटील (वय ६५) रा. मांडवे बु. ता. जामनेर हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांची तब्येत चांगली आहे. तर काही आपल्या गावी सुखरुप पोहचले आहेत. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोस्टे. ला तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.