आजाराला कंटाळून फास लावून आत्महत्या
बुलढाणा : पुतण्या घरासमोर रडताना दिसला. त्याला विचारणा केल्यावर त्याने घराच्या दिशेने बोट दाखविले. त्यामुळे घरात जाऊन पाहिले असता फासाला लटकलेला भावाचा मृतदेहच दिसला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे हा दुदैवी घटनाक्रम घडला. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आशीष वाघ (३०) हे आपल्या चुलत भावाच्या घरासमोरून जात असताना त्यांना पुतण्या रडताना दिसला. त्याची विचारपूस केल्यावर घरात जाऊन पाहिले असता नात्याने चुलत भाऊ असलेल्या प्रकाश रामदास वाघ (५९) यांचा फासाला लटकलेला मृतदेह दिसला. यामुळे धक्का बसलेल्या आशीष याने धामणगाव बढे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून ‘मर्ग’ दाखल केला. मागील दोन वर्षांपासून असलेल्या आजाराला कंटाळून प्रकाश वाघ यांनी भिंतींच्या लाकडी खुंटीला फास लावून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.