पाणी टंचाईची भीषणता! आठ वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू, संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको
बुलढाणा : पाणीटंचाईचा शाप लाभलेल्या नजीकच्या देऊळघाट येथील एका बालिकेचा खोल विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आठ वर्षीय जखमी बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी आज रास्ता रोको करीत प्रशासन व ग्रामपंचायतबद्दलचा रोष व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व बुलढाणा पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या गावात तणाव निर्माण झाला आहे. या रास्ता रोकोमुळे बुलढाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक किमान चार तासापासून ठप्प झाली. अंजली भरत शेजोळ (८) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती धनगर वाडी परिसरातील जमीन पातळीवर असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली असता तोल जाऊन विहिरीत पडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी रास्ता रोको करीत अजिंठा राज्य मार्गावरील वाहतूक रोखली. या सर्वांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आंदोलकांशी चर्चा करीत होते.