आदीवली शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त
मुख्याध्यापक पद भरण्याची शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
शहापूर तालुक्यातील टाकीपठार भागातील जिल्हा परिषद शाळा आदिवली येथे पहिली ते पाचवी असे एकूण 30 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण येथे असून इथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक यांची जिल्हा बदली झाल्याने येथील मुख्याध्यापक पद रिक्त झाले आहे. या कारणाने केवळ एकच शिक्षक पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे येथील मुख्याध्यापक पद रिक्त त्वरित भरावे किंवा तात्पुरती मुख्याध्यापकाची नेमणूक करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शाळा व्यवस्थापन समिती व येथील ग्रामस्थांनी शहापूर गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे केली आहे.
15 जून रोजी सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून गेल्या आठ दिवसापासून जिल्हा परिषद शाळा आदीवली येथे एकच शिक्षक पहिली ते पाचवी अशा पाचही वर्गांना अध्यापन करत आहे. एकच शिक्षकाला सर्व वर्गांवर लक्ष देणे शक्य नसल्याने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे.
येत्या आठ दिवसात रिक्त असलेले मुख्याध्यापक पद भरण्याचा खात्रीलायक आश्वासन गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी यावेळी उपस्थित आदिवली येथील पालकांना दिले. याप्रसंगी येथील मनोहर वेखंडे, ग्रामपंचायत सदस्या रतन वेखंडे,विठाबाई वेखंडेसह मोठ्या संख्येने महिला पालकांनी उपस्थिती दर्शविली होती.