शहापुरात अतिवृष्टीचा इशारा
चरीव,आल्याणी व कानवे गावांमध्ये सतर्कतेचा इशारा
शहापूर तालुक्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. मुसळधार पावसात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा अपघात होऊ नये म्हणून शासनाकडून अगोदरच नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत सूचना दिल्या असून शहापूर तालुक्यातील चरीव, आल्याणी, कानवे या गावांमध्ये मागील काही वर्षांपासून नदीच्या पुराचे पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होते या अनुषंगाने शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या गावांमधील नागरिकांना शाळा, कॉलेज, समाजमंदिर यासारख्या सुरक्षित स्थळी नागरिकांची व्यवस्था करण्यात यावी याबाबत सूचना केल्या आहेत.
पुढील चार-पाच दिवस ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्याने वरील नमूद ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच याबाबत गाव कोतवाल यांच्यामार्फत दवंडी देऊन आवश्यकता असल्यास तातडीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी करून त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करणेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण पूर्णताह भरण्याची स्थितीत असल्याने धरण परिसरातील नऊ ग्रामपंचायतींच्या तलाठी, पोलीस पाटील, तलाठी यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.-शहापूर तहसीलदार-डॉ. कोमल ठाकूर