जंगलात आढळले बालकाच्या कवटीचे तुकडे
दोन महिन्यांपूर्वी याच परिसरातील पियुष टबाले हे बालक झाले होते गायब
शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील काजूपाडा मधील अवघ्या दोन वर्षांच्या बालक घराच्या अंगणात खेळत असताना अचानक गायब झाले होते. त्यावेळी या परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांनी दोन महिन्यापूर्वी शोध घेऊन देखील या बालकाचा ताण पत्ता लागत नव्हता. अखेर याच परिसरात दोन वर्षाच्या बालकाच्या कवटीचे तुकडे सापडल्याने ते तुकडे दोन महिन्यापूर्वी गायब झालेल्या पियुषच्या कवटीचे असावेत असा प्राथमिक कयास पोलिसांनी लावला असून याप्रकरणी खर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाचे सापडलेल अवशेष शवविच्छेदनाकरिता देण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
काल पोलिसांना कुंभयीचा पाडा डोंगरातील जंगलात या बालकाची डोक्याची कवटीचे तुकडे सापडले
२६ एप्रिल रोजी काजूपाडा पिंपळपाडा आदिवासी वस्ती मध्ये राहणारा योगेश टबाले याची पत्नी योगिता लाकुड फाटा गोळा करण्यासाठी जंगलात गेली असता अंगणात खेळत असणारा पियुष अचानक गायब झाला होता. परिसरातील पाडे वस्ती मध्ये सर्व वस्तीतील लोकांनी शोध घेतला असता कुठे ही तो आढळून आला नाही.
खर्डी पोलिस ठाण्यात पियुष हरविल्याची तक्रार पिता योगेश टबाले कडून दाखल करण्यात आली होती.
काल कुंभईचा पाडा येथील जंगल परिसरात लहान मुलाच्या कवटीचे अवशेष सापडले. तेथे मिळून आलेल्या रक्ताळलेल्या शर्टावरून सदरच्या मृतदेहाचे अवशेष पियुषचे असावेत असा प्राथमिक कयास पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पियुष गायब झाला तेव्हा परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. बिबट्यानेच पियुषचा जीव घेतला असावा असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.