सरळांबे गावात दोघा सख्या भावांची निघृण हत्या एकाला अटक
शहापूर तालुक्यातील सरळांबे गावात रविवारी रात्रीच्या सुमारास दोघा सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी याच गावातील एकाला अटक केली असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच शहापूर पोलिसांनी योगेश धर्मा अधिकारी वय 35 पुंडलिक धर्मा अधिकारी वय 30 या दोघा भावांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शहापूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात हत्या झाल्याचे उघड झाले असुन घटना ही राञी ते पहाटेच्या दरम्यान घडली असावी असा कयास शहापूर पोलिसांनी वर्तविला आहे.
या निर्घूण हत्याकांडा बाबत मृतांचे वडील धर्मा लक्ष्मण अधिकारी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेतघरावर अटक इसम व मयत दोघे भाऊ हे तिघे दारू पित असताना पुर्वीच्या शेतजमीन वाटणी कारणावरून वाद झाला व अटक इसमाने वादामुळे रागाच्या भरात जीवे मारण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी हत्याराने दोघा भावांचे डोक्यात प्रहार करून ठार मारले. अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाटे उपविभागीय पोलिस अधीक्षक मिलिंद शिंदे शहापूर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस हवालदार पांडुरंग ढोबळे व पोलीस अंमलदार रमेश नलावडे यांनी याच गावातील पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोमनाथ बाळु अधिकारी वय 34 यास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव करत आहेत.