Breaking News
recent

डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात



औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिका नादुरुस्त,पिण्याचे पाणी,कर्मचाऱ्यांची पदे रिक्त शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल भागात असलेले डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्र असुविधांचे माहेरघर बनले असून, या ठिकाणी      आरोग्य सेवक -   ३ , डेहणे उपकेंद्र आरोग्यसेविका  - १, तलवाडा आरोग्य पर्यवेक्षक  - १,  शिपाई - ५ अशी तब्ब्ल १० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलबध्द होत नाहीत.   येथे असलेली १०८ रुग्णवाहिका देखील दोन दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गंभीर रुग्णांना पदरमोड करून खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. पुरेसा औषध साठा नसल्याने रुग्णांना अपुऱ्या वैद्यकीय सेवा मिळत आहेत.

           डोळखांब परिसर हा दऱ्याखोऱ्यांचा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती असल्याने व प्रसूती साठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी नादुरुस्त असलेली रुग्ण वाहिका, अपुरा औषध साठा आणि रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

      रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. १०८ रुग्णवाहिका देखील बंद आहे. डोळखांब परिसर आदिवासी बहुल असल्याने आदिवासी रुग्णांची संख्या मोठी आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथून ३० कि.मी. असल्याने आदिवासी रुग्णांना येथे जाणे परवडत नाही. ( स्थानिक नागरिक वसंत रसाळ )नेहमीच अपुऱ्या औषध साठ्यामुळे डोळखांब परिसरातील रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलबद्ध होत नाहीत. ( भाजपा सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर )१० आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्याकडे औषधांसाठी आपण मागणी करत असतो, मात्र जिल्हास्तरावर उपलब्ध साठ्याप्रमाणे आपणास औषध पुरवठा केला जातो. ( तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे )

Powered by Blogger.