Breaking News
recent

विवाहानंतर आठ दिवसांत कारागृहातील रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या; प्रेयसीसह सहाजणांवर गुन्हा

 

विवाहानंतर आठवडभरात कारागृहातील रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या प्रकरणाचे कारण उघडकीस आले आहे. प्रेमप्रकरणातून रक्षकाने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रेयसीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अमोल मुरलीधर माने (वय २८) असे आत्महत्या केलेल्या कारागृह रक्षकाचे नाव आहे. माने याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पल्लवी दिनकर धुमाळ (रा. येरवडा कारागृह वसाहत) दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतिक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी कारागृह रक्षक अमोल माने याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि पल्लवी यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवीने त्याला विवाहास नकार दिला होता. त्यानंतर अमोलला पल्लवी आणि नातेवाईकांनी धमकावण्यास सुरुवात केली. तुझ्याविरुद्ध तक्रार केल्यास निलंबित होईल, अशी धमकी पल्लवीने त्याला दिली होती. दरम्यान, अमोलचा विवाह ठरला. तो विवाहासाठी मूळगावी अहमदनगरला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याचा विवाह झाला. विवाहासाठी त्याने सुट्टी घेतली होती. विवाहानंतर तो पुन्हा कारागृहात रुजू झाला. तेव्हा पल्लवी आणि नातेवाईकांनी त्याला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. तू विवाह कसा केला ?, अशी विचारणा त्याच्याकडे करण्यात आली. तुझी बदनामी करतो. पोलिसांकडेव तक्रार दाखल करण्याची धमकी त्याला देण्यात आली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी कारागृहात पहाटे बंदोबस्तास असलेल्या अमोल मानेने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाइलवर संदेश लिहिला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करत आहेत.

Powered by Blogger.