दोन चोरट्यांना पाठलाग करून जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश
डहाणू प्रतिनिधि : महेश भोये
पालघर - पुणे येथून महिंद्रा थार ही महागडी कार चोरून गुजरातच्या दिशेने पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना पाठलाग करून जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश आल आहे . पुणे येथील वैजनाथ खरमाटे यांची थार ही काळ्या रंगाची कार घेऊन दोन चोरटे पुण्याहून प्रसार झाले होते. यानंतर पुण्यातील विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही कार घेऊन चोरटे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई कडून गुजरात मधील सुरतच्या दिशेने जात असल्याची माहिती फिर्यादी कडून पोलिसांना देण्यात आली होती .
तलासरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तलासरी पोलिसांनी गुजरात कडे जाणाऱ्या सर्व पोलीस चौक्यांवर नाकाबंदी सुरू केली असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील दापचारी येथील सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावरून ही कार भरधावेगात घेऊन दोन चोरटे गुजरातच्या दिशेने पसार झाले . यानंतर या कारचा पाठलाग करून तलासरी पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांसह कार ताब्यात घेतली आहे . या प्रकरणात मिलन विजयभाई जेठवाल (वय तेवीस वर्ष ) आणि शैलेश भिकुभाई हिंगु (वय 32 वर्ष ) या दोघांना अटक केली असून हे दोघेही सुरत येथील राहणारे असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पुण्यातील विमाननगर पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तलासरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी दिली . पुढील कार्यवाही करून ही कार फिर्यादीच्या ताब्यात दिली जाणार असून अवघ्या काही तासात कार मिळाल्याने फिर्यादी कडूनही समाधान व्यक्त करण्यात आलं .