मा. सु.पा. महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा
मानोरा प्रतिनीधी (वाशिम):- बाबुसिंग राठोड
दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी वितरण समारोह पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात गाडगे बाबांच्या प्रतिमापूजन व विद्यापीठ गीताने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.अरविंदभाऊ इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, श्रीमती साळुंखाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय ,वनोजा तसेच संस्थेचे सचिव मा.महादेवभाऊ ठाकरे आणि प्राचार्य डॉ. एन.एस. ठाकरे हे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी एकूण 73 विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. प्रस्तुत प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.ठाकरे यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रमांकडे वळण्यापूर्वी आपण किमान पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अविनाश निळे यांनी केले.कला शाखेत डॉ. ए.वाय.अली, विज्ञान शाखेत डॉ.एस.व्ही.केसवानी आणि वाणिज्य शाखेसाठी डॉ.अविनाश निळे यांनी स्थानिक अधिष्ठाता म्हणून पदवी वितरणाचे समालोचन केले.प्रत्येक शाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे सिल्वर मेडल वितरित करण्यात आले.प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयक्यूएसी समन्वयक डॉ.इक्बाल यांनी केले.