मतमाऊली अमृत महोत्सव निमित्त वधु वर परिचय मेळावा संपन्न
(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):
हरेगावच्या मतमाऊली अमृत महोत्सवी यात्रेच्या निमित्ताने संत तेरेजा चर्च मध्ये स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानच्या वतीने 139 व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन वंचीत बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैलजा अरुण साबळे ब्राम्हणे यांच्या शुभ हस्ते झाले. उदघाटनपर भाषणात डॉ. शैलजा म्हणालया की, शाहूमहाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांमुळेच ख्रिस्ती व बौद्ध समाजाची शैक्षनिक प्रगती झालेली आहे, नोकरीच्या निमित्ताने देशभर विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याचे "वधु-वर मेळावा" हे एक उत्तम माध्यम आहे.
मार्गदर्शन करताना डिस्ट्रिक्ट सुपेरिअर रेव्ह. फादर ज्यो गायकवाड म्हणाले की, ख्रिस्ती कुटुंबात धार्मिकता असेल तरच प्रेम आणि ऐक्य टिकून राहते. प्रगत पदवीधर संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश संसारे यांनी कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी आई वडिलांची प्रमुख भूमिका महत्वाची असल्याचे विषद केले. नाशिक सी एन आय धर्म प्रांताचे राजेश्वर पारखे यांनी मार्गदर्शन करताना पवित्र बायबल ची उदाहरणे देऊन सांगितले की, पती पत्नीचे नाते हे विश्वास आणि आशा यावरच आधारित आहे. यावेळी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणांहून आलेल्या विवाहेच्छूक व पालक यांची 210 हुन अधिक उपस्थिती दिसून आली. सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले. या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन वंचीत बहुजन आघाडीचे डॉ. अरुण साबळे यांनी उपस्थितांना दुपारच्या जेवणाची मेजवानी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष पंडित, सुभाष कदम, मायकल जाधव, कैलास भोसले, दिवेसर, रवी भोसले व सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम यांनी परिश्रम घेतले.