मुलगी झाली म्हणून आठव्या दिवशीच तोंडात तंबाखूचा गोळा टाकून हत्या
पहूर तिसरी ही मुलगी झाली म्हणून मुलीच्या बापाने आठव्या दिवशी मुलीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाकून ठार मारले.याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी न बुली बाई गोकुळ जाधव या महिलेची प्रसूती होऊन तिसरी मुलगी झाली.
प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी होऊन बाळासह जाधव कुटुंब हरी नगर ग तांडा या आपल्या गावी गेले. आशा सेविका मंगला जाधव यांनी मुलीची दप्तरी जन्माची नोंद केली. मात्र १० सप्टेंबर रोजी बालिकेचा मृत्यू झाल्याचे कळाले. जन्माला आल्यानंतर बाळाचं वजन साधारण २५०० ग्रॅम असणे आवश्यक असते. जन्माला आलेल्या जाधव यांच्या मुलीचे वजन २६०० ग्रॅम होते. आणि मुलगीचे प्रकृती देखील चांगली होती. सर्व काही व्यवस्थित असताना मुलीचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांना संशय आला वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमावत यांनी जाधव कुटुंबाच्या विरोधात पहूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.
पहुर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी तक्रारीचे तात्काळ दखल घेता आरोपीचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केली. आरोपीला पकडून विचारणा केली असता आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपी गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) रा. हरी नगर तांडा यांच्या विरुद्ध १२ रोजी रात्री १० वाजता ३०२,२०१ प्रमाणे पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बापाने कबुली दिल्यानंतर १३ रोजी आरोपीला घटनास्थळी नेऊन गावाजवळ असलेल्या नाल्याजवळ खड्डा मध्ये खोदून ठेवलेल्या मृत देहाची खात्री करून जिल्हाधिकाऱ्यांना कळवून मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते जागेवर पोस्टमार्टम करून मृतदेह ताब्यात घेतला. तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे