Breaking News
recent

एनडीए रस्त्यावर मद्यविक्री दुकानावर दरोडा; मद्याच्या बाटल्यांसह रोकड लुटली

 


पुणे : एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरातील एका मद्य विक्री दुकानात सशस्त्र दरोडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी पिस्तूल, कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. याबाबत मनोज बाळासाहेब मोरे (वय ३३, रा. कृष्णा रेसीडन्सी, कोंढवे धावडे) यांनी याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरात आर. आर. वाईन्स मद्य विक्री दुकान आहे. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री विश्वचषकातील अंतिम सामना सुरू होता. मद्य विक्री दुकानात गर्दी होती. त्या वेळी दुचाकीवरुन सहा जण आले. त्यांच्याकडे पिस्तूल, कोयता, तलवारी अशी शस्त्रे होती. चोरटे मद्य विक्री दुकानात शिरले. पिस्तूल, तसेच तलवार, कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड काढून घेतली.

दुकानातील मद्याच्या बाटल्या पिशवीत भरल्या. दुकानातील कामगार आणि ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे भरधाव वेगाने दुचाकीवरुन पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, सुनील तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर तपास करत आहेत.

Powered by Blogger.