एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात रवानगी
पुणे: सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपीला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०, रा. डोंगरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. जाधव याने सदाशिव पेठेतील पेरुगेट चौकी परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार केले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली होती. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला दोन महिन्यानंतर जामीन मंजूर केला. जाधव जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. गेल्या पाच वर्षांत त्याच्याविरुद्ध तीन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.
त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव विश्रामबाग पोलीस ठाणे, तसेच गुन्हे प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तयार केला.पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. जाधव याची वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ६० गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली आहे.