वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे नुकसान
जामोद जामोदसह परिसरातील सावळा, मालठाणा, करमोडा, शेवगासह इतरही शेत शिवारात ५ जानेवारीच्या रात्री ११.३०वाजताच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, कांदा, मकासह इतरही रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी कमालीचे संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक पूर्णपणे झोपून जमीन सपाट झाल्याने हाती आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेने हातचे गेले आहे. शेतकऱ्यांनी नुकत्याच सोंगून ठेवलेल्या तूर पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाने जामोदसह परिसरातील सावळा शेवगा मालठाणा करमोडा सोनबर्डी कुवरदेव, मेंढामारी उसरासह इतरही खेडे गावातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मागे खरीपाचे पिकांचे सुद्धा अतिवृष्टिने व सततच्या पावसाने अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे महसूल सदर पिकांचे महसुल विभाग व कृषी विभागाकडून पंचानामे व सर्व्हे सुद्धा करण्यात आले होते. त्यावेळेस शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत सुद्धा जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही त्याचबरोबर पिक विम्याची रक्कमही मिळालीच नाही. त्यातच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. तरी महसूल विभागाने व कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जमोदसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.