पारंपारिक पद्धतीने सर्व धर्मीयांचा आदर करून शिवजयंती साजरी करा-ठाणेदार विलास पाटील
नांदुरा दि.१७- आगामी शिवजयंती व इतर उत्सव सर्व धर्माचा आदर करून पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलासराव पाटील यांनी दिनांक १५ फेब्रुवारी रोजी निमगाव येथे नवनाथ महाराज संस्थान द्वारा आयोजित दिंडी सोहळ्यात उपस्थितांना केले. नवनाथ महाराज संस्थान निमगाव यांनी धर्मबीज महोत्सवानिमित्त आयोजित दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी ठाणेदार विलास पाटील निमगाव येथे आले होते. यावेळी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले युवक व नागरिक यांच्यासोबत संवाद साधताना ठाणेदार पाटील यांनी येणारी शिवजयंती व सर्व उत्सव सर्व धर्मीयांचा आदर करून पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. डीजेच्या कर्कश आवाजामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम व त्यामुळे होणारी हानी तसेच वाढती व्यसनाधीनता ह्या प्रमुख समस्या असून युवकांनी पारंपारिक पद्धतीने आपली संस्कृती जोपासावी तसेच सोशल मीडियावर कोणाच्याही भावना दुखतील अशा पोस्ट करू नये किंवा फॉरवर्ड करू नये असे मौल्यवान मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी दिंडी सोहळ्यातील सहभागी टाळकरी यांच्या फुगड्या व पावल्या या उपस्थित आमचे लक्ष वेधून घेत होत्या. या पारंपरिक सांस्कृतिक दिंडी सोहळ्यात सहभागी युवकांना ठाणेदार विलास पाटील यांनी बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवला.
( #टाळ -मृदंगाच्या ध्वनींनी सर्वच झाले मंत्रमुग्ध# नांदुरा- दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले टाळकरी गायक व मृदंगाचार्य यांनी पारंपारिक पद्धतीने विविध अभंग व पावली तसेच फुगडी च्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. दिंडी सोहळ्यातील सहभागी झालेल्या बालिका व त्यांच्या फुगड्या पाहून ठाणेदार विलास पाटील भारावले.