तळा शहराच्या पाणी योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
तळा : तळा तालुक्याची निर्मिती होऊन गेली अनेक वर्षे तळा शहराला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होत नव्हता. अनेक वर्षे तळा शहराला पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे नागरिक तळा शहरामध्ये वास्तव्य करण्यास नकार दर्शवित होते. येथील नागरिकांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत रायगडचे खासदार सुनील तटकरे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे तळा शहराला 13 कोटी 70 लाख योजनेची पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत शनिवार रोजी करण्यात आले. मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील ऐतिहासिक तळगड किल्ल्याच्या विकासासाठी, तसेच नगर पंचायत इमारत, पोलीस स्टेशन इमारत आदी प्रशासकीय इमारती तेथील कर्मचाऱ्यांची कमतरता, शिक्षण आरोग्य इत्यादी मुलभूत बाबींकडे उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात राजकीय कारकीर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा देत तालुक्यातील लोकाभिमुख विकास कामे करण्याची मला संधी मिळाली. ऐतिहासिक कुडे लेणी, द्रोनागिरी या ऐतिहासिक स्थळांची विकास कामे गतीने सुरु करण्यात आली आहेत. तालुक्यातील गिरणे नानवली मालाठे परिसरात खाडीवरील पुल बांधण्यासाठी निधी मिळाला यासाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्याचा परिणाम उद्याच्या भवितव्यासाठी या परिसराला होईल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना तळा शहराला भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी साधारणपणे 2054 सालची लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली आहे. वावे लघू पाटबंधारे योजनेमधून साधारणपणे 135 लिटर दरडोई दरदिवशी तळा शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होईल. अशा प्रकारचे नियोजन एन.व्ही.एटरप्रायजेस नाशिक या कंपनीने केले आहे. पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर वीजबिलाची समस्या येऊ नये म्हणून 75 केबी सोलर सिस्टीम द्वारे वीज निर्मिती करण्याचा अंतर्भाव तळा शहर पाणी पुरवठा योजनेमध्ये घेण्यात आला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास, कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीच्या विकासाबरोबर पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर तालुक्यातील विविध विकास कामे प्राधान्याने सोडवण्यात येतील.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतुल झेंडे. प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार,पोलिस कर्मचारी, पदाधिकारी, तळा तालुका युवक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.