देह व्यापाराच्या नावाखाली फसवणूक गुजरातमधील पाच जणांना १० दिवसांची पोलिस कोठडी
बुलढाणा (प्रतिनिधी) -
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बुलढाण्यातील एका युवकाची देह व्यापाराच्या नावाखाली ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुजराथमधील अहमदाबाद येथील पाच जणांना राजस्थानच्या मंडाना येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान पाचही आरोपींना ३ मार्च रोजी बुलढाणा न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिवान जैनुल आबेदीन (२०), फुझेल खान रशिद खान पठाण (२२), जीत संजयभाई रामानुज (२५), मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण (२६, रा.अहमदाबाद, गुजरात) आणि चिरागकुमार कोडाभाई पटेल (३०, रा. मोरैया, अहमादाबाद, गुजरात) यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सनील कडासने यांनी ४ मार्च रोजी दिली. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलिस आरोपींची पोलिस कोठडीदरम्यान चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले.
बुलढाण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एकाने २४ डिसेंबर २०१३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात कॉल गर्ल पुरविण्याच्या नावाखाली आपली ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. ऑनलाइन सर्च करताना मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर विचारणा केली असता सर्व्हिस पुरविण्यात येईल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे मागवून घेत ही फसवणूक करण्यात आली होती. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासात आरोपींनी वापरलेले बैंक खाती, मोबाइल नंबर, सीसीटीव्ही फुटेज व आरोपींचे मोबाइलवरून लोकेशन काढले.
दहा मोबाइल जप्त
आरोपीकडून 10 मोबाइल, १३ सिमकार्ड, ८ एटीएम कार्ड, १ चार चाकी गाडी व नगदी ७२ हजार रुपये असा ७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
• तक्रारदाराने नंतर टाकलेले पैसेही या आरोपींनी ऑनलाइन स्वीकारल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठी मदत झाली असल्याचेही पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.