जिल्ह्यातील शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण! आता संगमनेरातील धुसफूस चव्हाट्यावर; निवडणुकांमध्ये फटका बसणार.
संगमनेर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
संयुक्त शिवसेनेचे खंड करुन मूळ पक्षच ताब्यात घेणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येवू लागली आहे. साखर सम्राटांच्या अहमदनगर जिल्ह्यातही गटबाजीतून चक्क पदाधिकारीच दुखावले जात असल्याच्या एका पाठोपाठ घटना समोर आल्या आहेत. खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे खासगी सहाय्यक पक्षाची ‘वाट’ लावित असल्याचा व गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर आता संगमनेरच्या शहरप्रमुखांनीही याच मुद्द्यावर पक्षप्रमुखांचे लक्ष वेधले असून एकतर गटबाजी थांबवा किंवा आपल्याला पक्षकार्यातून मुक्त करा असा निर्वाणीचा इशाराच दिला आहे. पक्ष वाढीच्या कार्यात प्रामाणिक प्रयत्न करीत असताना ठराविक व्यक्तिंनाच जवळ करण्याचे तंत्र वेदनादायी असल्याची नाराजीही या पत्रातून ठळकपणे मांडण्यात आली आहे. श्रीरामपूरनंतर संगमनेरच्या शहरप्रमुखांचा हा पत्रव्यवहार खूपकाही सांगून जाणारा असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला लागलेले पक्षातंर्गत गटबाजीचे ग्रहण पक्षाला फटका देणारे ठरणार आहे.
लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपावरुन वाटाघाटी सुरु आहेत. येत्या आठवडाभरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील ३५ जागा कमळ चिन्हावर लढवण्याचा सल्ला भाजपला दिला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील जागा वाटपात शिवसेनेला शिर्डीसह अनेक जागांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत काहीही करुन उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी आपली ‘लॉबी’ तयार करण्यासाठी पक्षाचीच ‘वाट’ लावायला सुरुवात केल्याचे आरोप आता त्यांच्यावर होवू लागले आहेत.
गेल्या आठवड्यात राजूरचे शहरप्रमुख विक्रम जगदाळे यांनी गटबाजीबाबत नाराजी व्यक्त करुन प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याकडे तालुकाप्रमुखांचे लक्ष वेधले होते. कामाच्या बदल्यात अपेक्षित सन्मान मिळत नसल्याने काम करण्याचा उत्साह संपला, त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याची वेदना त्यांनी आपल्या पत्रातून मांडली होती. त्यानंतर श्रीरामपूरचे तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र धाडले. या पत्रातून त्यांनी थेट खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे खासगी सहाय्यक शिवाजी दिशागत यांच्यावरच शरसंधान साधले.
खासदार लोखंडे पक्षवाढीसाठी काहीच करीत नसून केवळ गटबाजीला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचा हा प्रकार तत्काळ थांबवला नाहीतर तालुका व शहर पदाधिकारी आणि शिवसैनिक राजीनामे देतील असा इशाराही त्यांनी दिला होता. ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदेगट जवळ केला. खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे सहाय्यक शिवाजी दिशागत ठाकरे गटात असताना त्यांनी पक्षवाढीसाठी काहीच केले नाही, उलट गटबाजी वाढवली. त्याला वैतागूनच आम्ही शिंदेगटात प्रवेश केला. मात्र आता खासदार लोखंडेही पक्षाचा भाग असल्याने त्यांनी पूर्वीप्रमाणेच पक्ष पोखण्याचे उद्योग सुरु केल्याचा घणाघाती आरोप या पत्रातून करण्यात आला होता.
शहरात अथवा तालुक्यात पक्षाच्या बॅनरखाली होणार्या कार्यक्रमांची व बैठकांची माहिती चक्क पदाधिकार्यांनाच नसते असा धक्कादायक आरोपही शेरकर यांनी आपल्या पत्रातून केला आहे. हा सगळा प्रकार केवळ गटबाजीतून घडत असून पक्षाचे नुकसान होत आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्याशी संपर्क ठेवणार्या पदाधिकार्यांना डावलण्याचे षडयंत्र ते राबवित आहेत. या दोघांकडून शिर्डी मतदार संघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी सुरु असून लवकरच पत्रकार परिषदेद्वारा त्यांच्या कर्तृत्वाचा पर्दाफार्श करणार असल्याचा इशाराही बापूसाहेब शेरकर यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. शुक्रवारी (ता.८) अशाच नाराजीतून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन काशिद यांनीही पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नाराजीचा रोखही खासदार लोखंडे यांच्याकडेच असून पदाधिकार्यांना डावलून होणारे कार्यक्रम, बैठका वेदनादायक असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून सांगितले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतून उफाळलेला नाराजीचा हा प्रवाह आता संगमनेर शहरातही येवून पोहोचला आहे. शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी पक्षातंर्गत गटबाजीवर बोटं ठेवताना स्थानिक पातळीवरील ठराविक व्यक्तिंचे वरीष्ठ पातळीवरील महत्व अपमानजनक असल्याची वेदनाही व्यक्त केली आहे. आपल्या धडाकेबाज कार्यातून प्रेरणा घेवून प्रामाणिकपणे पक्षवाढीचा प्रयत्न केला. मात्र पक्षाकडून कोणतीही मदत अथवा प्रोत्साहन मिळाले नाही. केलेल्या कामाचे कौतुक तर दूरच मात्र त्यापोटी गटबाजीतून उपेक्षाच पदरी पडल्याची खंतही कानकाटे यांनी व्यक्त केली आहे.
पक्षात प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करण्याचा शब्द देण्यात आला होता, मात्र अद्याप तो देखील पूर्ण केला गेला नाही. शहरप्रमुख म्हणून पक्षाकडून जे सहकार्य मिळायला हवे ते मिळाले नाही. ठराविक लोकांनाच जवळ धरुन राजकारण केले जाते. हा प्रकार त्रास देणारा असून आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याने थांबून घ्यावे का? असा सवाल उपस्थित करणारा आहे. यावर आपणच निर्णय घेवून न्याय करावा अशी गळ मुख्यमंत्र्यांना घालण्यात आली आहे. विक्रम जगधने, बापूसाहेब शेरकर, अर्जुन काशिद आणि त्यानंतर आता सोमनाथ कानकाटे यांची पक्षातंर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने येणार्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अशात भाजप राज्यातील ३५ जागांसाठी आग्रह करीत असल्याच्याही चर्चा समोर येत असल्याने शिर्डीच्या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तिसर्यांदा मोदी लाटेवर स्वार होण्याचा इरादा ठेवून शिंदे गटात दाखल झालेल्या सदाशिव लोखंडे यांच्या पदरी यावेळी निराशा येण्याची दाट शक्यता आहे. बबन घोलप यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. अशा स्थितीत लोखंडे यांनी शिवसेनेत आपली ‘लॉबी’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात पक्षाचीच ‘वाट’ लावल्याचा गंभीर आरोप होवून जिल्ह्यातील शिवसेनेत राजीनाम्यांचे सत्र सुरु झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची किती गांभीर्याने दखल घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.