दैनिक अहिल्याराज तर्फे गोपाळकुमार कळसकर ‘इंडियन एक्सलंस अवार्ड’ने सन्मानित
तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती दिनी २ जून रोजी भार्तृमंडळ, मलकापूर येथे ‘इंडियन एक्सलंस अवार्ड २०२५’ सोहळा नुकताच संपन्न झाला. सुप्रसिद्ध दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन हा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाने यावेळी साजरा करण्यात आला. ‘इंडियन एक्सलंस अवार्ड’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार मानला जातो. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी दैनिक अहिल्याराज वृत्तापत्रातर्फे या पुरस्कार सोहळ्याचे वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजूभाऊ काजळे (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर) हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ) हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निलेश तायडे (सहा माहिती आयुक्त, मंत्रालय मुंबई), संदीप काळे (ठाणेदार, मलकापूर ग्रामीण), भाई अशांत वानखेडे (संस्थापक समतेचे निळे वादळ), प्रसादभाऊ जाधव (राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष), बाळासाहेब दामोदर (उद्योजक), प्रा. डॉ. अनिल खर्चे सर (प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही. भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज), फारुख शेख (ज्येष्ठ पत्रकार लोकमत), दामोदर शर्मा (शेतकरी नेते), वीरसिंह राजपूत (ज्येष्ठ पत्रकार व संपादक मलकापूर दै .आज तक ) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. आयुध निर्माणी वरणगांव येथील पत्रकार गोपाळकुमार चांगदेव कळसकर यांचा ‘इंडियन एक्सलंस अवार्ड २०२५’ने यावेळी मेडल, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दैनिक बाळकडू, व्हाईस ऑफ योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा, अधिकारनामा, तेजोमय न्यूज, दर्पण, दैनिक अहिल्याराज,महाराष्ट्र ग्रामीण न्यूज इ.विविध वृत्तपत्रांतून व सामाजिक माध्यमांतून कायम जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.
झेप फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेचे ते जळगांव जिल्हा सचिव असून या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड, रक्तदान शिबिरे, महापुरुषांची जयंती साजरी करणे, संविधानिक मुल्यांचा प्रचार करणे, उपेक्षितांचे प्रश्न सोडविणे असे विविध समाजसेवी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या या समाजसेवी कार्याची दखल दैनिक अहिल्याराज वृत्तपत्र व हिंदी मराठी पत्रकार संघाने घेतली आहे. विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक व पत्रकार संघटनांकडून गोपाळ कळसकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. विविध क्षेत्रातील २६० मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील, विदर्भातील पत्रकार राजकीय मंडळी, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गणगे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.