Breaking News
recent

वीज टंचाईच्या विरोधात भाजपा मलकापुर उतरली रस्त्यावर

MAVआघाडी शासनाला दाखवला कंदील


    राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात रविवार 24 एप्रिलला भारतीय जनता पार्टीतर्फे भाजपा कार्यालय मलकापूर येथे  सायंकाळच्या सुमारास शासनाला कंदिल दाखवा आंदोलन करण्यात आले. मा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री  चैनसुख संचेती  यांच्या  नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात यावेळी बोलताना श्री चैनसुख संचेती म्हणाले, राज्यातील सध्याच्या वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे हे आंदोलन आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो. देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा " भाजपा मा प्रदेश उपाध्यक्ष श्री चैनसुख संचेती यांनी केली.

    सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहताच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा धीसाळ नियोजन शून्य कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. राज्यातील सुमारे 27वीजनिर्मिती संयंत्रे बंद किंवा जेमतेम चालवली जात आहेत. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे. सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकल्यानंतर त्याची वीज कापणाऱ्या आणि थकबाकीचे कारण देत भारनियमन लादणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटींची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या बेशिस्तीमुळे वीज मंडळाचा कारभार ढासळला असून आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप अशा अभ्यास गटाची नियुक्तीच झालेली नसल्याची माहिती मिळत असून वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही श्री चैनसुख संचेती यांनी केला.

    देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असे ते म्हणाले. कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात आहे. कमाल मागणीच्या वेळात सुमारे सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा असताना अन्य क्षेत्रातून जेमतेम 1300 मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. सरकारने खरेदी केलेल्या विजेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी खाजगी क्षेत्राकडून वीज नियामक आयोगाकडे केल्या जात असल्याने राज्य सरकारची पत संपुष्टात आली आहे. एकीकडे थकबाकी वाढत असताना विशिष्ट खाजगी पुरवठादारांशी हातमिळवणी करून चढ्या दराने वीज खरेदी करावयाची आणि त्याचा भार ग्राहकाच्या माथ्यावर मारून टक्केवारीचे राजकारण करावयाचे असा वसुली सरकारचा हेतू असेल तर तो हाणून पाडला जाईल असा इशाराही भाजपा मा प्रदेश उपाध्यक्ष श्री चैनसुख संचेती यांनी दिला.

    खाजगी क्षेत्राकडून वीज खरेदीच्या दरावर केंद्र सरकारने मर्यादा घातल्याने राज्य सरकारमधील हितसंबंधीयांची कोंडी झाली असून टक्केवारीच्या राजकारणात अडथळे येत असल्याने त्यांचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळेच कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला वीजसंकटात ढकलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच सर्वात मोठे वीजचोर असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

    यावेळी उपस्तित श्री संजय काजळे भाजपा तालुका अध्यक्ष श्री मिलिंद डवले भाजपा शहराध्यक्ष श्री मोहन  शर्मा जिल्हा भाजपा महामंत्री  श्री केदार एकडे जी प सदस्य डॉक्टर श्री योगेश पटणी जैन गुजराती अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष श्री संतोष बोंबटकार श्री निलेश जयस्वाल श्री डॉक्टर विजय डागा भाजपा महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यां किसान आघाडीचे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी तथा सर्व बूथ प्रमुख व कार्यकर्ता बांधव 

Powered by Blogger.