आरटीई प्रवेशास २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ ;आतापर्यंत ५,५२१ बालकांचे प्रवेश निश्चित
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत ५,५२१ बालकांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश
प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत ५,५२१ बालकांचे प्रवेश
निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. विहित वेळेत बालकांचे प्रवेश निश्चित
करण्यावे असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर
यांनी पालकांना केले आहे.
बालकाच्या मोफत आणि
सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी
अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
राबविण्यात येते. मागील काही वर्षांपासून आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत
प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षांकरिता ६४८ शाळा पात्र असून १२ हजार
२६७ जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात या प्रवेश प्रक्रियेला २१ फेब्रुवारीपासून
सुरुवात झाली होती. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातून एकूण २५ हजार ७०२ अर्ज
प्राप्त झाले होते. त्यापैकी निवड प्रक्रियेत १० हजार ४२९ बालकांची निवड करण्यात
आली आहे. या बालकांचे २० एप्रिलपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चत करण्याचे आवाहन
शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आले होते. परंतु, आता प्रवेश निश्चत
करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत ५,५२१ बालकांचे प्रवेश
निश्चित झाले असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यामध्ये
सर्वाधिक म्हणजे १,७४५ विद्यार्थी हे ठाणे ग्रामीण क्षेत्रातील
आहेत. त्यामुळे उर्वरित बालकांचे प्रवेश शासनाने दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करुन
लवकरात लवकर निश्चित करावा असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पालकांना
करण्यात आले आहे.