आरोग्य सुविधांची पुर्तता करून रूग्णांचे जीवन सुकर करा -केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : शासकीय रूग्णालयांमध्ये गोर गरीब उपचारासाठी येतात. त्यांना
आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडू नयेत. प्रत्येक आरोग्याची सुविधा ही शासकीय
रूग्णालयांमध्ये असायला पाहिजे.
तरी आरोग्य यंत्रणेने शासकीय
रूग्णांलयांमध्ये आरोग्य सुविधांची पुर्तता करून रूग्णांचे जीवन सुकर करावे, अशा सूचना केंद्रीय
आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिल्या.
चिखली येथील स्वरांजली हॉटेलच्या
सभागृहात आरोग्य व संबंधित यंत्रनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी
आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश
फुंडकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. एन एम राठोड उपस्थित होते.
जिल्ह्यातील माता मृत्यूंची कारणे
शोधण्याच्या सूचना करीत डॉ. पवार म्हणाल्या, बाल मृत्यू दर कमी होत आहे. मात्र
माता मृत्यू दर वाढत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवावे. रूग्णालयांना आवश्यक
असलेल्या साहित्याची मागणी नोंदवावी. आलेल्या साहित्याचा रूग्णसेवेत उपयोग करावा.
जिल्ह्याला प्राप्त झालेली सर्व व्हेटींलेटर सुरू ठेवावी. एकही व्हेंटीलेटर बंद
असता कामा नये. बंद असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. चिखली रूग्णालयाला सिटी
स्कॅन मशीन देण्यात यावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. जिल्ह्यात 44 डायलिसीस युनीट पाच
केंद्राच्या माध्यमातून सुरू आहेत. जिल्ह्यात किडनी आजाराच्या रूग्णांची संख्या
लक्षात घेता हे सर्व युनीट व्यवस्थित सुरू ठेवावे. त्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
डायलीसीसचे वेटींग रूग्ण कमी करावे. तसेच रूग्णालयात ग्लुकोमीटरसह सर्व आवश्यक
सुविधा द्याव्यात. नसलेलया ठिकाणी एक्स रे मशीन, इसीजी मशीन द्याव्या. प्रत्येक
प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथील आवश्यक औषधे व तपासण्यांची यादी लावावी.
याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य मिशनची
तरतूद व खर्च, आयुष्यमान भारत योजना, प्राथमिक व
उपकेंद्र इमारती, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री
जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदींचाही
आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.