८० जागांसाठी १३ हजार ४४५ विद्यार्थी देणार नवोदयची परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षा २०२२ येत्या ३० एप्रिल रोजी ४२ परीक्षा केंद्रावर होणार आहे. ८० जागेसाठी तब्बल १३ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना यांना सूचना देऊन कळवण्यात आले आहे. दि. ३० एप्रिल शनिवार रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२२ वर्ग सहावी प्रवेशासाठी बुलडाणा जिल्हयातील एकूण ४२ परीक्षा केंद्रावर ही परिक्षा होणार असून त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र संकेत स्थळावर लॉगीन करुन प्राप्त करता येणार आहेत. यासाठी युजर नेम हे विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज भरताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर राहील व पासवर्ड विद्यार्थ्यांची जन्म तारीख राहील. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरलेले असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात येऊ शकत नाही. या परीक्षेसाठी सर्व विद्याथ्र्यांनी दि. ३० एप्रिल रोजी सकाळी साडे दहा पर्यंत दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद व नवोदय विद्यालय शेगावचे प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे. विशेष म्हणजे प्रवेश पत्र दोन प्रतिमध्ये डाउनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडून स्वाक्षरी करून घ्यावे. हे स्वाक्षरीत प्रवेश पत्र परीक्षा पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे.