Breaking News
recent

पालकांनी खेळाडूंना उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत करावे - आमदार संजय गायकवाड



  बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनातुन खेळाडूंनी खेळ संस्कृती जोपासुन, योग्य खेळाची निवड करुन, सराव केल्यास, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू जिल्ह्याचे, राज्याचे, राष्ट्राचे नावलौकीक करतील. अशा उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात येत असलेले उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर हे मोलाचे ठरत आहे तालुका क्रीडा संकुल, बुलडाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चरी रेंजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आहे.  शरीराच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक प्रगतीसाठी खेळासारखा उत्तम पर्याय नाही.  प्रत्येकाने कोणताही एक खेळ खेळला पाहिजे, त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले. 
      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा तसेच  जिल्ह्यातील विविध खेळांच्या एकविध संघटना यांचे संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे जिल्हास्तरावर मैदानी, आर्चरी, कबड्डी, खो-खो, हॅण्डबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कराटे, बॉक्सिंग, जिम्नॅस्टीक आदी खेळाचे प्रशिक्षण शिबीर 22 एप्रिल ते 12 मे या कालावधीत, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सकाळी 6 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 7.30 या दरम्यान आयोजन सुरु आहे.  सदर शिबीरामध्ये बुलडाणा शहरातील व आजु-बाजुच्या परिसरातील सुमारे 200 ते 300 खेळाडू सहभागी झाले असुन प्रशिक्षणार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून नियमित मार्गदर्शन सुरु आहे. आज 25 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांनी प्रशिक्षण शिबीराला भेट दिली. सकाळच्या सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्याहस्ते सकस आहाराचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी आंतरराष्ट्रीय सायकल पटू संजय मयुरे यांचेसुध्दा स्वागत करुन करण्यात आले.
संचालन हॅण्डबॉल प्रशिक्षक मनोज श्रीवास यांनी तर आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी मानले.  याप्रसंगी गजानन घिरके, विजय वानखेडे, रवि भगत, अरविंद अंबुसकर, संजय चितळे, प्रा. रिंढे, मोहम्मद सुफीयान, सुहास राऊत उपस्थित होते.  शिबीरा दरम्यान सकाळच्या सत्रात सर्वप्रथम राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.  सहभागी खेळाडूंना रोज सकाळच्या सत्रात अल्पोपहार, खाऊ वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते.
    शिबीराचे यशस्वी आयोजनाकरीता कार्यालयातील क्रीडा अधिकारी बी.के.घटाळे , आर.आर.धारपवार, विजय बोदडे, ए.एच.चांदुरकर, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले.   शिबीरामध्ये अधिकाधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
 **********
Powered by Blogger.