कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट
मलकापूर
मलकापूर : सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचे हक्काची शाळा म्हणजेच जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य भेट देऊन "सामाजिक कर्तव्य" असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला
ग्रामीण भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जिल्हा परिषद अंतर्गत किंवा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या शाळा ह्याच गुरुकुल असतात व या शाळा शासनाच्या अनुदानावर चालत असतात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य सुद्धा लागत असतं परंतु गत दोन वर्षाचा काळ बघितला तर कोरोना मुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आधीच आर्थिक संकट ओढवले आहे व अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण करावयाच्या तरी कश्या असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे. ही बाब कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन च्या सदस्यानी विचारात घेत, एकदांदर एक महिना भर "सामाजिक कर्तव्य" उपक्रम राबवित तालुक्यातील गणवडी, खामखेड, पिंपळखुटा, गौलखेड, हरणखेड, निमखेडे, तेलखेड, शिवणी, या सह इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात उपलब्ध करून दिले. या भेटवस्तू स्वीकारत असताना त्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद हा काही वेगळाच जाणवत होता. कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे राबविलेल्या या उपक्रमाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे "आपणही समाजाचे काही देणं लागतो" अशा उदात्त भावनेतून नेहमीच असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच हा एक भाग होता. यानंतर सुद्धा आवश्यक उपक्रम राबविले जाणार असल्याचे मत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पाटील यांनी व्यक्त केले.