Breaking News
recent

जिजाऊ सृष्टी येथे १५ मे ते १७ मे २०२२ दरम्यान होणार विविध कार्यक्रम



            आजादी का अमृत महोत्सवा निमित्त सांस्कृतीक कार्य मंत्री यांच्या कल्पनेतून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीला कळावे, तरुण पिढीने राष्ट्रमातेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या हेतूने सांस्कृतीक कार्य मंत्री यांच्या सूचनेप्रमाणे १५ ते १७ मे या कालावधीत जिजाऊ गाथा महोत्सव २०२२ कार्यक्रमाचे आयोजन दररोज सायं ६ ते रात्री १० या वेळेत 'जिजाऊ सृष्टी' सिंदखेड राजा याठिकाणी करण्यात येत आहे. जिजाऊ गाथा या महोत्सवाची सुरूवात १५ मे रोजी सकाळी ६ वा सर्वप्रथम दिंडीने होणार आहे. 

    जिजाऊ मातेच्या राजवाड्यापासून दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ गाथा या कार्यक्रमाचे उद्घाटन १५ मे रोजी सायं. ६.३० वा. जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तसेच विविध रसिक प्रेक्षक, प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत होणार आहे. लोककलेच्या माध्यमातून माँ साहेब जिजाऊ छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे या सारख्या थोर महापरुषांच्या विजयी गाथा या कार्यक्रमातून आपणास ऐकायला मिळणार आहे. १५ मे रोजी कोल्हापूरचे हलगी सम्राट संजय आवळे यांचे रणवाद्य वादन होणार असून सुप्रसिद्ध गायिका शिवमती वैशाली माडे यांच्या गायनातून शौर्यगाथा सादर होणार आहे. सिंदखेड राजा येथील महिला कीर्तनकार ज्योती ताई जाधव यांचे मासाहेब जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान रुपी कीर्तन होणार आहे. १६ मे रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर, गायक नंदेश उमप, मुंबई यांचे शाहिरी पोवाडा या सोबतच सातारा येथील उदय यादव यांचे मदीनी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. 

    तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक कलावंतांचा एक रंगारंग महोत्सव यादरम्यान सादर होणार आहे. यात पोवाडा, लोकगीत, एक पात्री, गवळण यासारख्या विविध गायन प्रकाराचा आनंद रसिकप्रेक्षकांना घेता येईल. येथे जिल्ह्यातील १७ मे रोजी नांदेड येथील शिवश्री डॉ. शिवराज शिंदे यांचा शाहिरी जलसा तर वाशीम येथील समाज प्रबोधनकार शिवश्री शामभाऊ वानखडे यांचा लोक जागर हा कार्यक्रम होणार आहे तसेच बाल कलाकार सप्त खंजीरी वादक शिव कुमारी क्रांती काळे - दर्यापूर, बाल शाहीर सतीश कुरांगड सिदखेडराजा आणि अंकुश परिहार जाफराबाद यांचे बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद आपणास घेता येईल. त्यासोबतच अतिशय महत्त्वाचा, सुंदर, दैदिप्यमान व नेत्रदीपक कार्यक्रम म्हणजे सांगली येथून भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर प्रतिकृती सादर केली जाणार आहे. अशा या भरगच्च कार्यक्रमामध्ये जिजाऊ सृष्टी येथे प्रेक्षकांसाठी सेल्फी पॉइंट्स, रोशनाईचा झगमगाट, थोर महापुरूष यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचे स्टॉल, सनई चौघड्यांचे वादन व ऐतिहासिक रांगोळीचे रेखाटन केले जाणार आहे. जिजाऊ सृष्टी सारख्या निसर्गरम्य परिसरामध्ये होणाऱ्या या भव्य सोहळा सर्व रसिकांना विनामूल्य असून विद्यार्थी पालक व अवतीभवतीच्या परिसरातील रसिक प्रेक्षकांनी, चोखंदळ अभ्यासकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक, सांस्कृतीक कार्य यांनी केले.





चौकट


भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

जिजाऊ गाथा या ३ दिवशीय महोत्सवात विविध नामवंत कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास रसिक प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. सतत तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबई चे प्रसिद्ध पार्श्वगायिका शिवमती वैशाली माडे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर शाहीर नंदेश उमप तसेच भूपाळी ते भैरवी हा प्रसिद्ध कलापथक लोककलांच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर सादर करणार आहेत. यासोबतच रण वाद्यांची जुगलबंदी, मर्दानी खेळ, गोंधळ, भारुड, पोतराज आदी विविध कलांचा आस्वाद प्रेक्षकांना या महोत्सवात मिळणार आहे.




Powered by Blogger.