घाटंजी जि. यवतमाळ येथील आर.टी.आय कार्यकर्त्यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी
प्रतिनिधी
ग्राम पारवा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची१५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. माहिती अधिकार अधिनियम नियमानुसार माहिती मागितली म्हणून सुड भावनेने सदर क्रूर हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आले आहे. सदर घटना ही अत्यंत धक्कादायक असून महाराष्ट्राच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी आहे. शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे, जागरुक व संवेदनशील नागरिकांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी सदरची घटना आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव धोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी माहिती अधिकार कार्यकर्ते लावत असतात. या प्रकरणात व कटात सामील असू शकणारी व अपराध्यांना चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्यांना आरोपी करून कसून चौकशी करावी तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे, हल्ले करणे, मारहाण होणे व त्यांच्या हत्या होणे अशा घटनांमध्ये वरचेवर वाढ होत आहे. ही गंभीर बाब आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सुरक्षा व संरक्षण यासंबंधी शासनाने धोरणात्मक उपायोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. शासनाने या संबंधी उपाय योजना कराव्यात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.
तसेच मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून दोषी आरोपींना सहा महिन्याच्या आत कठोरातील कठोर शिक्षा मिळावी मृत अनिल ओचावार यांच्या कुटुंबांला किमान दहा लाख रुपयांची शासनाने मदत करावी. अशा प्रकारचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शाखा मलकापूर तालुका प्र.प्रमुख धर्मेशसिंह राजपूत यांनी माननीय तहसीलदार श्री. आर.यु.सुरडकर यांचेमार्फत माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.