क्रीडा भारतीच्या वतीने ठिकठिकाणी योग दिनानिमित्त सामुहिक योग साधना उपक्रम
मलकापूर प्रतिनिधि
जागतिक योग दिनानिमित्त तालुका क्रीडा भारती द्वारा शहरातील विविध संस्था, संघटन व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सामुहिक योग व ध्यान साधना उपक्रम संपन्न झाले.
शहरातील विविध मैदानावर घेण्यात आलेल्या या उपक्रमात गोविंद विष्णू महाजन विद्यालय, श्रीमती के.के.अग्रवाल महाविद्यालय, एम.ई.एस.ज्युनिअर काॅलेज, एम.ई.एस. काॅन्हेट, लि.भो.चांडक विद्यालय, एम.एस.एम.इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थांचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थ्यी व कर्मचारी सहभागी झाले. तसेच यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल सामुहिक योग उपक्रम सहभागी होऊन जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या पटांगणात क्रीडा भारती व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक योग साधना उपक्रमासाठी योग मार्गदर्शक म्हणून पतंजली योग संस्था मलकापूरचे हरिभाऊ पाटील व सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक प्रा.पाचपांडे तर प्रमुख उपस्थितांमध्ये, क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष राजेश महाजन, भाजपा जिल्हा महामंत्री मोहन शर्मा, भाजपा तालुका अध्यक्ष संजय काजळे, शहर अध्यक्ष मिलिंद डवले, क्रीडा भारती तालुका प्रा.डाॅ नितीन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विविध योगासने करून सामुहिक ध्यानधारना करत जिवनात नियमित योगासने करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य एम.पी.कुयटे यांनी केले.