Breaking News
recent

मोहिदेपूर येथील बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई



प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर

  बुलडाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील बनावट देशी दारू बनविण्याच्या कारखान्यावर रविवारी, दि. 24 जुलै 2022 रोजी कारवाई केली. जगन घाटे यांच्या शेतामध्ये ही कारवाई करण्यात आली. यात एक लाख दोन हजार 795 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आयुक्त श्री. उमाप, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त व्ही. पी. चिंचाळकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनात दि 24 जुलै 2022 रोजी मोहिदेपूर शिवारातील शेती मधील टिनशेडमध्ये आरोपी योगेश उत्तम घटे, अतुल अरुण माणकर, सुरेश जनार्दन धुळे, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद यांना अवैधरीत्या बनावट देशी बनवताना अटक केली. त्यांच्याकडून 30 लिटर बनावट देशी दारु, एक बुचे सिलबंद करण्याची मशीन, 180 मिली क्षमतेच्या 535 रिकाम्या बाटल्या, दोन हजार 100 कागदी लेबल, 60 पृष्ठांचे खोके, एक हजार 350 जिवंत बुचे, एक पाण्याची टाकी, 35 लिटर क्षमतेच्या 6 कॅन, अल्कोहोल मीटर, तीन मोबाईल असा एकूण एक लाख दोन हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  यातील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65, 80, 81, 83, 90, 103, 108 आणि भा. प. वि. 328 कलमानुसार गुन्ह नोंद करण्यात आला आहे. यातील एक आरोपी फरार असून काही संशयीत आहे. यातील आरोपींना सोमवार, दि. 25 जुलै 2022 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

   या कारवाईत प्र. निरीक्षक एन. के. मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे, पी. व्ही. मुंगडे तसेच जवान संवर्गीय कर्मचारी श्री. एडसकर, श्री. मोरे, श्री. सुसरे, श्री. देशमुख, श्री. साखरे, श्री. सोळंके यांनी सहभाग घेतला.

   बनावट मद्य तसेच गावठी हातभटटी दारुच्या सेवनामुळे जिवितहानी किंवा गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागाचा टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉटसअॅप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov. in पोर्टलवर माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडुन यावर्षी देशी मद्य 1896 लिटर, हातभटटी, 2471, सडवा 53491 लिटर, विदेशी मद्य 310 आणि बिअर 142 लिटर आणि 23 वाहनांसह एकूण 384 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तसेच 370 आरोपींसह एकूण 48 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येते. वाहन चालविताना वाहनाचा परवाना आवश्यक आहे. मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येत आहे.


Powered by Blogger.