महाकवी वामनदादा व दिवंगत प्रतापसिंगदादा हे गुरू-शिष्य आंबेडकर चळवळीचे भाष्यकार ठरलेत - अशांतभाई वानखेडे
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपली संपूर्ण हयात आंबेडकरी चळवळीचे गीते तयार करून ते जलसे सादर करीत समाजमनाचे प्रबोधन केले,त्यांनी महाराष्ट्र भर डॉ बाबासाहेब यांच्या कार्यचळवळीचे स्फुलिंग जनतेच्या मनामनात पेटविले ! महाकवी वामनदादा कर्डक व दिवंगत कविवर्य प्रतापसिंगदादा बोदडे हे गुरू-शिष्य आपल्या कवित्वाने आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ठरलेत असे भावोदगार समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांनी काढले.
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती मलकापूर तालुक्याच्या वतीने 'महाकवी वामनदादा कर्डक जयंती सोहळा व प्रख्यात कवी गायक प्रतापसिंगदादा बोदडे श्रद्धांजली ' या कार्यक्रमाचे आयोजन महेश भवन मलकापूर येथे करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून भाई अशांत वानखडे बोलत होते
आजही वामनदादा यांचा वसा घेऊन कलावंत आपल्या चळवळी ची प्रबोधनात्मक शाहीरी जिवंत ठेवत आहेत ,परंतु शासन त्यांच्या मानधना विषयी उदासीन असून बरेच कलावंत या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. हलाखीचे जीवन जगणाऱ्या सर्व कलावंतांना शासनाने मानधन देऊन त्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मांगणी ही यावेळी भाई अशांत वानखडे यांनी केली
विचार मंचावर यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात गायक नागसेनदादा सावदेकर, कवी उत्तमदादा फुलकर,शाहीर डी.आर.इंगळे, कुणालदादा बोदडे ,सु.मा. शिंदे,डॉ.जी.ओ.जाधव,विनोद कपले,रामचंद्र वराडे छोटू महाराज,शाहीर पुंडलिक मोरे,विजयकांत मोरे आदी मान्यवर हजर होते.महाकवी वामनदादा कर्डक तसेच प्रतापसिंग बोदडे यांना त्यांनी लिहलेली अजरामर गीते गाऊन श्रध्दांजली अर्पण केली.विविध ठिकाणावरून आलेल्या शाहीर,कलावंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक दिलीप इंगळे यांनी केले तर शाहीर विजयकांत मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.