मंजूर व प्रलंबित सत्याग्रहींना मिळणार मानधन - लोकतंत्र सेनानी संघाचा रिट अर्ज काढला निकाली
प्रतिनिधी
आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींना बंद झाले मानधन पूर्वीप्रमाणे सुरू व्हावे यासंदर्भात लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्राच्या वतीने उच्च न्यायालयात रिट दाखल करण्यात आली होती. पुन्हा याच विषयावर अर्ज करण्याचा हक्क अबाधित ठेवून २३ ऑगस्टला हा अर्ज औरंगाबाद खंडपीठाकडून निकाली काढण्यात आला आहे.
आणीबाणीविरोधात लढा देणाऱ्या व १९७५ ते ७७ या कालावधीत कारावास भोगलेल्या सेनानींना राज्यशासनाच्या वतीने मासिक मानधन देण्यात येत होते. युती सरकारच्या काळात हा निर्णय लागू करण्यात आला होता. राज्यात नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही योजना बंद केली होती. बंद झालेल्या मानधना संदर्भात रामराव जाधव व अरुण उपाध्ये यांनी वैयक्तिक रिट दाखल केले होते. श्री. जाधव यांनी नोव्हेंबर २१ मध्ये आपला अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर लोकतंत्र सेनानी संघ आणि श्री. उपाध्ये यांचा अर्ज उच्च न्यायालयाने एकत्रित चालवले होता. श्री. उपाध्ये यांच्या अर्जात फक्त स्वता:च्या बंद झालेल्या मानधनाचा उल्लेख होता. तर संघाच्या अर्जात आधी मंजूर असलेल्या ३४५२ सदस्य व मंजूर परंतु मानधन न मिळालेल्या ८०० सदस्यांचा उल्लेख करून त्यांना सुरुवातीपासून मानधन मिळावे अशी मागणी केली होती. दरम्यान नव्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच बैठकीत बंद केलेले मानधन सुरु करण्याचे मान्य केले. त्यामुळे श्री उपाध्ये यांनी केस परत घेण्यासाठी जुलै २२ मध्ये अर्ज दाखल केला होता.
मा. उच्च न्यायालयाने २८ जुलै २२ च्या सुनावणीत संघालाही केस परत घेण्यास सांगितले होते. मात्र जीआर मिळाल्यानंतर विचार करू असे संघाने मा. न्यायालयाला सांगितले. त्यानुसार २३ ऑगस्ट २२ रोजी शासनाकडून जीआर कोर्टात सादर केला गेला. मंजूर ३४५२ सदस्य व प्रलंबित ८०० सदस्यांना प्रत्यक्ष मानधन मिळेपर्यंत केस मागे घेणार नाही अशी भूमिका संघाने घेतल्याने सरकारी वकिलांनी निवेदनाच्या निर्णयात सर्वांना मानधन देणार असल्याचा उल्लेख करून केस निकाली काढावी अशी न्यायालयास विनंती केली. मानधन न मिळाल्यास पुन्हा याच विषयावर अर्ज करण्याचा हक्क अबाधित ठेवून अर्ज निकाली काढला आहे. अशी माहिती लोकतंत्र सेनानी संघाचे राज्याचे अध्यक्ष रघुनाथ दीक्षित, राज्याचे माजी कार्यालयमंत्री तथा विद्यमान उपाध्यक्ष रामेश्वर घोराळे, अनिल भदे, अनंतराव आचार्य आदींकडून देण्यात आली.
-