शहरातील अवैध धंदे बंद करा अथवा मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोर अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी प्रहारची मागणी
मलकापूर
शहरातील अवैध धंदे बंद करा अथवा मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोर अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्याकडे आज ८ सप्टेंबर रोजी एका निवेदन वजा विनंती अर्जाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. यामध्ये वरली खेळविणे तसेच गुटखा व अवैध दारूची सर्रास विक्री सुध्दा होत आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. चौका चौकामध्ये या अवैध व्यवसायीकांमुळे अनेकांना त्रास होतो. अवैध वरलीचे व्यवसाय करणारे तर ठिकठिकाणी जागा मिळेल तेथे आपला व्यवसाय करतांना दिसतात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी प्रतिबंध घालण्यात आलेल्या गुटखा पुड्यांची सर्रास व खुलेआमपणे जोमात विक्री सुरू आहे. तसेच अवैध दारूचा जणू मलकापूर शहरात महापुरच आला आहे. याबाबत तक्रारी होवूनही कुठलीही ठोस अशी कार्यवाही करण्यात येत नाही. तेव्हा मलकापूर शहरातील सुरू असलेले हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा आम्हाला मलकापूर शहर पोलीस स्टेशन समोरच अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी.
मलकापूर शहरातील हे अवैध धंदे बंद करण्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना तातडीने न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या काळात जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही दिलेल्या निवेदनात अजय टप यांनी नमूद केले आहे.