अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा मार्फत मलकापूर येथे मलकापूर अर्बन बॅंकेच्या सभागृहात चर्चा सत्राचे आयोजन
मलकापूर प्रतिनिधी धर्मेशसिंह राजपूत
दरवर्षी प्रमाणेच येणाऱ्या काही दिवसातच दसरा दिवाळी यासारखे हिंदू धर्मीयांचे सण संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या उत्सवांच्या काळात बाजारपेठेत खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. त्या पार्श्वभूमीवरच अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा यांचेमार्फत मलकापूर येथे मलकापूर अर्बन को-ऑप.बँक लि.च्या प्रशस्त सभागृहात दि. 30/09/2022 रोजी दुपारी 4:00 वा.चर्चा सत्राचे आयोजन माजी आमदार श्री.चैनसुखजी संचेती यांचे अध्यक्षतेखाली मलकापूर व्यापारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा येथील सहाय्यक आयुक्त श्री. केदारे साहेब प्रमुख अतिथी म्हणून व श्री. वसावे साहेब अन्नसुरक्षा अधिकारी बुलढाणा हेही उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त श्री.केदारे साहेब यांनी उपस्थित व्यापारी बांधवांना मार्गदर्शनात सांगितले की येणारा काळ हा सणासुदीचा आहे. किराणा व्यापारी बांधवांनी हलक्या प्रतीचा, स्वस्त असणारा माल न विकता उच्च प्रतीचा व मान्यताप्राप्त माल ग्राहकांना विक्री करावा.नुकतेच चिखली तालुक्यामध्ये भगरीच्या पिठापासून काही लोकांना विषबाधा झाली होती. त्यामुळे किराणा व्यापाऱ्यांनी माल घेताना मान्यता प्राप्त ठोक विक्रेत्यांकडूनच योग्य प्रकारचा माल घ्यावा. तसेच माल घेताना बॅच नंबर,मालाचा दर्जा,उत्पादन करणारी मान्यता प्राप्त कंपनी, वस्तूंची पक्की बिले इ. घ्याव्यीत व ग्राहकांनाही पक्के बिले द्यावित.
तसेच दिवाळी सारख्या सणांमध्ये तेल,बेसन,मैदा,रवा यासारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी असते सध्या खुल्या प्रकारच्या तेलाची विक्री शासनाने बंद केलेली आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी कोणत्याही प्रकारचे खुले तेल विक्री करू नये. तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. तसेच किराणा व्यापाऱ्यांनी ग्राहकांना याबाबत अधिक जागरूक करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तसेच अन्नसुरक्षा अधिकारी श्री.वसावेसाहेब बुलढाणा यांनी अन्नभेसळ प्रतिबंध कायद्याबाबत माहिती देत व्यापारी बांधवांना अधिक जागृत व सतर्क राहण्याबरोबर अन्नपरवाना, अटी नियम व शर्ती याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी व्यापारी संघटना मलकापूरचे कार्याध्यक्ष श्री.अशोकशेठ राजदेव, उद्योजक श्री.दिलीपशेठ वाधवानी, सिपीडीएचे अध्यक्ष श्री.श्याम चांडक, किराणा असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.दीपक दोशी हे उपस्थित होते. तसेच मलकापूर शहरातील किराणा व्यावसायिक, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विवेक डागा तर आभार प्रदर्शन श्री.विनोदसेठ राजदेव यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ज्ञानदीप राऊत, अजय चांडकाई, पियुष शर्मा, धर्मेशसिंह राजपूत, विराट सदावर्ते यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न केला.