बॅन्जो केमिकल प्रकरणात माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले घनाघाती आरोप
![]() |
कामगारांच्या संभाव्य उपासमारीचे विद्यमान लोकप्रतिनिधी व जेष्ठ विधीतज्ञांवर फोडले खापर |
मलकापूर:-बॅन्जो केमिकल कंपनीला ठोठवलेल्या दंड प्रकरणात,कामगारांना न्याय मिळावा या भुमीकेतून भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी दि. १० ऑक्टोंबर रोजी स्थानिक भाजपा कार्यालयात पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार संचेती यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ विधीतज्ञ यांच्यावर घनाघाती प्रहार केले. परिसरात मोठे उद्योग आणून बेरोजगांरांना रोजगार देणे हे खऱ्या अर्थीने राज्यकर्त्यांचे कर्तव्य असले पाहिजे.मात्र सद्यस्थितीत लोकप्रतिनीधी व विधीतज्ञ मिळून बेंझो सारख्या उद्योगासमोर अडचणी निर्माण करत असून या अडचणीतून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेकरीता ठरावीक रक्कम गोळा केल्या जात आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या आड कंपनीला बदनाम करणे व कामगारांना बेरोजगार करणे. असा चुकीचा प्रकार होत असून हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा व आरोप भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी दिला.
कंपनी समोर अनंत अडचणी निर्माण केल्यास परिणामतः सदर कंपनी दुसरीकडे स्थलांतरीत झाल्यास कामगारांचे काय होणार?हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असून बेरोजगारीचे संकट ओढावल्यास परिवाराचा गाडा कसा ओढावा?अशी भिती व चिंता कामगारांना सातत्याने सतावत आहे. कंपनी दुसरीकडे स्थलांतरीत झाल्यास १ हजार कामगारांवर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या परिवारातील ५ हजार पेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे या कामगारांवरसुध्दा अन्याय होता कामा नये ही ठोस भुमीका भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी घेतली.त्यातच शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान झाले नसल्याची बाब दस्तुरखुद्द शेतकऱ्यांनीच पत्रकार परिषदेत मांडली.
२५ कोटी दंड झालेला असतांना २५० कोटी दंड झाला आहे, हे सांगण्यामागचे नेमके कारण तरी काय? न्यायालयीन खर्चापोटी ठरावीक रकमेची मागणी करणे ही बाब कितपत माणुसकीचे लक्षण आहे ? सदरचे प्रकरण हरीत लवादात सुरु असतांना अनेकांनी पडद्यामागे गुपचूपपणे सदर कंपनीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. अशी हातमिळवणी करुन मलीदा लाटणाऱ्या टोळक्यांची कर्मकृत्ये जनतेने या पुर्वीही अनुभवली आहेत.एकीकडे सुरु असलेल्या प्रकाराला शेतकऱ्यांचा लढा म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांचीच दिशा भूल करुन पैसा कमवायचा हाच यांचा धंदा झाला आहे की काय ? यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटते की नाही ? असा सवाल उपस्थित करीत दूरदृष्टी नसलेल्या स्वार्थी व अपरिपक्व नेत्यांमुळे मलकापूर विधानसभा मतदार संघ भकास होण्याच्या मार्गावर असल्याबाबतही भाजपा नेते संचेती यांनी चिंता व्यक्त केली. अशा नेत्यांना परिसरातील शेतकरी व कामगार धडा शिकविल्याशिवाय निश्चितच स्वस्थ बसणार नाही असा विश्वास देखील भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
` या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कामगारांनी लोकप्रतिनिधी व विधीतज्ञाच्या कार्यावर संशय व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रीया दिल्या. त्याच प्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांनी आमच्या शेती याच परिसरात असून आमचे शेतीचे कसलेही नुकसान झाले नाही अथवा उत्पादन क्षमतेतही घट निर्माण झाल्याचे दिसून आले नाही. महत्वाचे म्हणजे सदरहू शेतांमध्ये विहीरी असून याच विहीरीचे पाणी बागायती करीता व पिण्याकरीता वापरल्या जात असून आम्हाला त्याचा कसलाही त्रास झाला नसल्याची बाबही शेतकऱ्यांनी ठासून सांगितली.
मागील काही दिवसात परिसरात तज्ञ वैज्ञानिकांची चमू येवून बेंझो कंपनीच्या पाण्याची व परिसरातील शेतातील पिकांची तपासणी करुन गेले. दरम्यान त्यांनी पाण्याचा अहवाल देत या भागात कंपनीच्या पाण्यामुळे कोणत्याही शेतातील पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवालसुध्दा सादर केला. त्याच प्रमाणे १० वर्षातील प्रशासकिय आणेवारी पाहता नैसर्गिकरित्यासुध्दा पिकांचे नुकसान झाले नसल्याची बाबत व विहीरीचे पाणी दुषीत झालेले नसून कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही हे तज्ञ वैज्ञानिकांनी दिलेला अहवाल व आणेवारी अहवालावरुन सिध्द होते असे मत भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी सदर अहवाल पत्रकारांना दाखवित वास्तव परिस्थीतीचे स्पष्टिकरण दिले.
या वेळी भाजपाचे शिवचंद्र तायडे, संजय काजळे पाटील, माधवराव गावंडे, शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, विलासराव पाटील, साहेबराव पाटील, भगवान पाटील, शंकरराव पाटील, अमृत बोंबटकार आदी मंडळींसमवेत दसरखेड परिसरातील शे तकरी बांधव कंपनीतील अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.