अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा?? सरसकट पंचनामे करा, तहसीलदारांना आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या सूचना
मुसळधार व संततधार पावसाने पिके संपूर्णपणे नष्ट झाल्याचे ढळढळीत दिसत असूनही प्रशासन पंचनामे का करत नाही? अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा? असा संतप्त सवाल करीत सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना आज आ. श्वेता ताई महाले पाटील यांनी तहसीलदारांना केल्या.
मागील अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. कधी वादळी तर कधी अवकाळी पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने काठावरचे सोयाबिन व इतर पिके तर कधीचीच नष्ट झाली. सोयाबिन काढणीची वेळ टळून गेली, पण पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना सोयाबिन सोंगता येत नाही. ज्यांनी सोयाबिन सोंगले ते सोयाबिन सडले. ज्या सोयाबिनची काढणी झाली नाही ते पीक पाण्यात उभे आहे. काढणी झालेल्या आणि उभ्या अशा दोन्ही प्रकारच्या सोयाबिनला कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यातच "पंचनामे करा, आर्थिक मदत द्या", अशी मागणी शेतकरी करत आहेत; पण प्रशासन पंचनामे करीत नाही.
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार आणि संततधार पावसाने कहर केला असून उरली-सुरली सर्व पिके हातातून गेली आहेत. प्रशासनाला हे दिसत आहे. तरीही पंचनामे करण्यासाठी प्रशासन कुणाची वाट पाहत आहे? अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा? असा संतप्त सवाल तहसीलदारांना केला.19 ऑक्टोबर रोजी रायपूर, धाड, मासरुळ, म्हसला, पाडळी या महसुली मंडळात व परिसरात अतिप्रचंड पावसाने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी रुईखेड, मायंबा, चांडोळ, कुंबेफळ, टाकली, म्हसला बु. या गावांमध्ये जाऊन केली.
या वेळी आ. श्वेता ताई महाले पाटील,तहसीलदार रुपेश खंदारे, देविदास पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, संदीप उगले पंचायत समिती सदस्य, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, विष्णु वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, विष्णु उगले सरपंच, राजू चांदा, गजानन देशमुख, गजानन सपकाळ, सखाराम नेमाडे, पुरूषोत्तम भोंडे, विशाल गाजगणे, कौतिकराव ओळेकर, साहेबराव उगले, गणेश सोमुने, शिवाजी उगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.