Breaking News
recent

राष्ट्रीय खेळ स्पर्धेत बुलढाण्याच्या मोनाली जाधवला सुवर्णपदक

 


बुलढाणा प्रतिनिधी

गुजरातमध्ये सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत ५ ऑक्टोबर रोजी धनुर्विद्या खेळात बुलढाणा येथील मोनाली जाधवने कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर प्रथमेश जवकार याला कांस्य पदक मिळाले. दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे मार्गदर्शन मिळाले. राष्ट्रीय खेळ ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. यावर्षी २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत गुजरातमध्ये ही स्पर्धा होत आहे. अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भाव नगर या सहा शहरांमध्ये खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय खेळांमध्ये यावर्षी सुमारे ७००० खेळाडू ३६ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यापूर्वी २०१५ साली केरळमध्ये राष्ट्रीय खेळ झाले होते.


आता सात वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर स्पर्धा पार पडत आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये कामगिरी दाखवण्याची चढाओढ लागली आहे. मोनाली जाधवने धनुर्विद्या खेळात जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व
एक कांस्य पदक पटकावलेले आहे. सिनिअर नॅशनल स्पर्धेत रजत पदक व तीन कांस्य पदक मिळवले आहे. सिक्स ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत कांस्य पदक, सेव्हन ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत चार सुवर्ण पदक व एक कांस्य पदक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे. प्रथमेश जवकार याने यापूर्वी चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. याच वर्षी एशिया कप स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत १२ पदके मिळवले आहेत. खेलो इंडियाचा तो स्कॉलर आहे. आता राष्ट्रीय खेळामध्ये त्याने कांस्यपदक मिळवले आहे.
Powered by Blogger.