ग्रामीण कोटा बँकेला सर्कीटने आग; कागदपत्रे जळून खाक
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर शहरातील वृंदावन नगर येथील ग्रामीण कोटा बँकेला शॉर्ट सर्किटने आग लागून महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. वृंदावन नगर येथे ग्रामीण कोटा बँकेमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने महत्त्वाचे सर्वच कागदपत्र जळून खाक झाली. ही घटना येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य गाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माजी नगरसेवक अनिल गांधी यांना माहिती दिली.
त्यांनी तातडीने पालिकेच्या अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देत अग्निशमन दलाच्या वाहनासह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. चालक वासुदेव भोपळे व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न केले असता थोड्या वेळाने आग आटोक्यात आली.
यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसून, महत्त्वाची सर्व कागदपत्रे मात्र जळून खाक झाली. या घटनेची पोलिसांना माहिती पडताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहेत.