मलकापूर शहरातील वाहतूक पोलीस महेश चोपडे यांच्या सतर्कतेमुळे 5 लाख कॅश पैसे व 3 लखाचे दागिने मिळाले परत
मलकापूर:- शेती विकत घेण्यासाठी आजोबांनी नातवाला पैसे व दागिने देऊन मामाकडे पाठविले असता भाच्याच्या नजरचुकीने मलकापूर बस पकडून मलकापुरात आला. परंतु त्या वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आजोबाला नातू व पैसे परत मिळाले ही घटना आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की सोहम दिलीप धूड वय 15 वर्षे राहणार सुलतानपूर हा अल्पवयीन तरुण चिंचोलीला मामा कडे जाण्यासाठी निघाला असता तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याच्या कडे शेती घेण्यासाठी नोकरीतून व शेती उत्पादनातुन जमा केलेले 5 लाख रुपये कॅश व 3 लाखाचे दागिने असे एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल दिला व मामा कडे जाण्यास सांगितले. परंतू सोहम बराच वेळ होऊन सुद्धा तो मामा कडे पोहचला नसता त्याचा बराच वेळ शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
दरम्यान मलकापूर मध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास सदर तरुण तहसील चौक येथून जात असतांना तो चिंततेत दिसून आला ही बाब वाहतूक पोलीस महेश चोपडे याच्या लक्षात येतांच त्यांनी तरुणाचा पंचायत समिती पर्यंत पाठलाग करून त्याला तिथं विचारणा केली व त्याच्या कडे लाला रंगाची मोठी बॅग दिसून आली. त्या बॅग ची चैन उघडून बघितले असता त्या मध्ये कॅश पैसे व दागिने आढळून आले या बाबतची वाहतूक पोलीस महेश चोपडे यांनी पोलिसात माहिती दिली असता ए.पी.आय. सुखदेव भोरकडे, ईश्वर वाघ, गोपाळ तारुळकर, सलीम बर्डे घटनास्थळी दाखल झाले व सदर तरुण व मुद्देमाल घेऊन ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलिसांना तरुणांच्या नातेवाईकांना दिली असता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून जबाब नोंदविला. या बाबत मलकापूर पोलिसांनी पैश्यांनी भरलेली बॅग व दागिने सदर तरुणाच्या नातेवाईकांना सुपुर्द केले. यावेळी त्यांनी त्या वाहतूक पोलिसांचे व मलकापूर पोलिसांचे आभार मानले.