विदर्भातील सर्वात मोठा वधू-वर परिचय पालक मेळावा ८ जानेवारी रोजी आयोजित
मलकापूर
मराठा सेवा मंडळ अकोलाद्वारा आयोजित उपवर-वधू व पालक मेळाव्यास ८ जानेवारी रोजी अकोला येथे मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आपल्या मुला-मुलींना सोबत घेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा मंडळ मलकापूर अध्यक्ष सदाशिवअण्णा भोईटे यांनी केले आहे.
४१ वर्षाची परंपरा असलेल्या विदर्भातील सर्वात मोठा वधू-वर परिचय पालक मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा मंगल कार्यालय, रामदास पेठ, पोलीस स्टेशनच्या बाजूला अकोला येथे ८ जानेवारी रविवार रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. गेल्या ४१ वर्षापासून नियमितपणे मराठा सेवा मंडळ अकोलाद्वारा मोठ्या स्वरूपात उपवर-वधू व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. हजारोंच्या संख्येने समाज बांधव या मेळाव्यात दरवर्षी सहभागी होतात. या वधू-वर परिचय मेळाव्यात शेकडोंचे विवाह संबंध जुळून येतात. नाते संबंधाबाबत नव्याने माहिती होते, तरी ज्या समाज बांधवांच्या मुलं-मुली विवाहयोग्य आहेत त्या सर्व समाज बांधवांनी आपल्या मुलांसह या वधू-वर परिचय व पालक मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवा मंडळ, मलकापूरचे अध्यक्ष सदाशिवअण्णा भोईटे यांनी केले आहे.