दारू पीण्यास पैसे न दील्याने फवारणीचे विषारी औषध पाजून इसमाचा खून तिघा बाप लेकाविरुध्द गुन्हा दाखल : दोघांना अटक
नांदुरा दारू पीण्यास पैसे न दिल्याने तिघा जणांनी ५१ वर्षांच्या इसमाचा फवारणीचे विषारी औषध पाजून खुन केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील येरळी येथे तीन जानेवारी रोजी सायंकाळी घडली. रामदास लक्ष्मण वसतकार असे मृतकाचे नाव असून या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी तिघा बाप लेकाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून अमोल आत्माराम दीवनाले व सुरेश दीवनाले या दोघा भावांना अटक केली. तिसरा आरोपी त्यांचे वडील आत्माराम दीवनाले हे मात्र फरार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील येरळी येथील आरोपी अमोल आत्माराम दीवनाले त्याचा भाऊ सुरेश दीवनाले व वडील आत्माराम दीवनाले हे तीघे जण मृतक रामदास लक्ष्मण वसतकार वय ५१ यांना नेहमी दारू पीण्यास पैसे मागत असत. रामदास दीवनाले यांनी आरोपींना पैसे देणे बंद केल्याने आरोपी हे रामदास यांना सतत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.
तसेच आरोपी अमोल दीवनाले हा मृतक रामदास यांना तुला एखाद्या दिवशी फाशी देतो किंवा पॉईजन पाजून मारुन टाकतो असे म्हणाला होता. दरम्यान मंगळवारी तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता आरोपी अमोल दीवनाले हा मृतक रामदास यांना म्हणाला की तु दारु पीण्याकरीता सोबत चल नाही तर दारू पीण्यास पैसे दे मात्र मृतक रामदास यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी अमोल दीवनाले त्याचा भाऊ सुरेश दीवनाले व वडील आत्माराम दीवनाले यांनी मृतक रामदास यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने त्या घटनेची मृतक रामदास यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर आरोपी हे मृतक रामदास वसतकार यांचे घरी गेले आणि रामदास यांचा मुलगा श्रीराम याचे समोर रामदास यास म्हणाले की तु आमच्यासोबत चल आम्हाला तुझी माफी मागायची आहे. यापुढे आम्ही तुझ्या सोबत भांडण करणार नाही असे बोलून मृतक रामदास यांना त्यांच्या वाडग्याजवळ घेऊन गेले. यानंतर रामदास यांचा भाऊ समाधान वसतकार यांनी रामदास यांच्या घरी जाऊन
आरोपी तीघेही जण रामदास यांना मारहाण करून काही तरी जबरदस्तीने पाजून राहीले आहेत अशी माहिती त्यांचा मुलगा श्रीराम वसतकार यास दिली. या माहिती नंतर मुलगा श्रीराम हा काका समाधान वसतकार यांच्यासह वाडग्याजवळ गेला असता त्याला वडील रामदास हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचे तसेच त्यांच्या जवळ मनोसील फवारणीचे विषारी औषधीची बॉटल दिसून आली. तसेच वडील रामदास यांच्या तोंडातून फेस आलेला व मनोसील औषधाचा वास येत असल्याचे दिसून आल्याने मुलगा श्रीराम व काका समाधान वसतकार यांनी रामदास यांना तातडीने उपचारासाठी नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृतक रामदास वसतकार यांचा मुलगा श्रीराम वसतकार वय २३ याने आरोपी अमोल आत्माराम दीवनाले त्याचा भाऊ सुरेश दीवनाले व त्यांचे वडील आत्माराम दीवनाले या तीघांनी माझे वडील रामदास लक्ष्मण वसतकार यांना जबरदस्तीने मनोसील नावाचे विषारी औषध पाजून जिवे ठार मारून टाकले अशी फिर्याद दिल्यानंतर नांदुरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३४ भादवीचा गुन्हा दाखल करुन अमोल दीवनाले व सुरेश दीवनाले या दोघा भावांना अटक केली आहे. आत्माराम दीवनाले हा मात्र फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.