पुलाचे काम अर्धवट, रहिवाश्यांचे मात्र प्रचंड हाल ....
कल्याण प्रतिनिधी अविनाश कापडणे
शहापूर तालुक्यातील वाऱ्याचापाडा येथे जाण्यासाठी लेनाडी नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू असून जाण्या-येण्यासाठी नदीच्या पात्रातून केलेली पर्यायी आणि तकलादू व्यवस्था पहिल्याच पावसात वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शाळकरी मुले, कामगार, शेतकरी, कर्मचारी, वृद्ध, गर्भवती माता, लघुउद्योजक यांचे प्रचंड हाल व नुकसान होत आहे.
१००% आदिवासी वस्ती असलेल्या वाऱ्याचापाडा या गावाला गोकुळगाव येथून गावात जाण्यासाठी असणारा लेनाडी नदीवरील पूल कमकुवत झाल्याने लाखो रुपये खर्च करून शासनाने नवीन पूल मंजूर केला. खरेतर पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु उशिरा आणि संथगतीने सुरू असलेले काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शेजारील गावात मजुरी साठी जाणारे मजूर आणि शाळकरी मुले जीव मुठीत धरून नदीपात्रातून वाट काढत जात आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडू शकते. एखादी दुर्घटना घडल्यास किंवा होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असणार? असा सवाल येथील नागरिक करत आहेत