Breaking News
recent

पावसाळयात चढणीचे (वलगणीचे) मासे मिळवण्यासाठी झुंब



 डहाणू प्रतिनिधि : महेश भोये 

    पालघर जिल्ह्यात अनेक दिवसापासून पाऊस दाखल झाला, असून नदी नाल्यामध्ये पाणी भरभरून वाहत आहे. या पावसाच्या पाण्यात मिळणाऱ्या चढणीचे (वलगणीचे) मासे मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी नदीनाले गाठले आहेत. तर समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे सध्या खवय्यांनी देखील आपला मोर्चा गोड्या पाण्यातील मास्यांकडे वळवला आहे. 

    पावसाळा पूर्वी बहुतांशी नद्या या प्रवाहित असल्या तरी डोंगर दऱ्यांतील पाण्याचे झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. या काळात नद्यांमधील मासे नदी-नाल्यांच्या डोहात जमतात. पावसाळा सुरू झाला की डोंगरदऱ्यांतून नदीला मिळणाऱ्या पाण्यामुळे नदीचा प्रवाह पूर्ववत होऊन मास्यांना ताजे पाणी मिळते. या ताज्या पाण्याचा ओढीने मासे सैरभैर होऊन प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर काही प्रवाह सोबत पोहत जातात. 

    नेमका याच काळात मास्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे मासे कमी पाण्याचे क्षेत्र शोधून तिथे अंडी घालण्यासाठी येतात. कमी पाण्यात येण्याच्या प्रयत्नात मासे शेताच्या पाण्यात आणि छोट्या ओहोळांमध्ये येतात. हे मासे मिळवण्यासाठी लोक छोट्या ओहोळांमध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागात मास्यांचे जाळे (पागेर) आणि झोलवा घेऊन मासे पकडण्यासाठी सज्ज होतात.

    समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे खवय्ये सध्या गोड्या पाण्यातील मास्यांकडे वळले असून पहिल्या पावसात मिळणाऱ्या चढणीच्या मास्यांना बाजारात चांगली मागणी आहे. चढणीच्या काळात मिळणारे मासे हे बहुतांशी संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास मिळून येत असून लोकं रात्रभर जागून मासे गोळा करतात. मिळवलेले मासे घरी खाण्यासाठी ठेऊन उरलेल्या मास्यांच्या विक्रीतून मासे पकडणाऱ्यांना चांगला नफा मिळवता येतो. ग्रामीण भागांतील अनेक आदिवासी कुटुंब तर सद्या या व्यवसायात लागले आहेत. 

    धामणी धरण, कवडास धरण,सुर्या नदी, इतर ओहळ या परीसरात अनेक जण पहाटे हे मासे पकडन्याचे काम करीत आहेत. यात दिवसाला चांगली कमाई सुद्धा होत आहे. पावसाळयात चढणीच्या काळात कडवाली, शेगट, मल्या, पाती, दंडावणी, नीह्या, कालोसा, नार शिंगाळी, काळी शिंगाळी यासारखे मासे मोठ्या प्रमाणात मिळून येतात. बाजारामध्ये सध्या गोड्या पाण्यातील मास्यांना मागणी वाढली असून छोटे मासे प्रत्येकी ५०ते १०० रुपये वाटा आणि मोठे मासे २०० ते ३० रुपये किलो प्रमाणे विक्री केले जात आहेत. यामुळे मासे पकडणाऱ्यांना चांगला नफा मिळवता येत आहे. 

काही औषध वापरून मासे पकडत असल्याने माश्यांचा प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

अलीकडच्या काळात मासे मिळवण्यासाठी टी.सी.एल. सारख्या विषारी औषधांचा वापर केला जात असल्यामुळे लहान -मोठ्या सर्व मास्यांना विषबाधा होऊन मासे मृत झाल्यामुळे सध्या गोड्या पाण्यातील मास्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी औषधे वापरून करण्यात येणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्याची गरज व्यक्त होत आहे.


ग्रामीण भागात सध्या नदी नाल्यात, धरणाच्या किनारी मासे मारी करुन दररोज पांच ते सात किलो मासे मिळतात. त्यातून तीनशे ते चारशे मिळतं असून घरची भाजी सुटते व यामुळें संसाराला हातभार लागतो.--कृष्णा सावर.. मासेमारी करणारा.

पावसाळ्यात सद्या समुद्राची मासेमारी बंद झाल्याने  नदी नाल्यातून मिळणारे ताजे मासे आम्हीं खरेदी करीत आहोत. यात काही लहान मासे चविष्ट असतात.--कल्पेश पाटील... ग्राहक

Powered by Blogger.