आपदामित्र, सखी सारखे प्रयोग ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवणार -- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
महसूल सप्ताहाच्या शहापूर मधील कार्यक्रमात ndrf चा गौरवविविध मान्यवरांना देखील पुरस्कार
आपत्तीच्या काळात शहरांपेक्षा ग्रामीण भागात पोहोचण्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी व पथकांना वेळ लागत असल्याने शासनाने नव्याने निर्माण केलेल्या आपदामित्र, सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुणांना आपत्तीच्या काळात तात्काळ उपाययोजना कशाप्रकारे करता येतील याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ अनिता जवंजाळ यांनी शहापूर येथे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या महसूल सप्ताहच्या ' एक हात मदतीचा ' या कार्यक्रमात व्यक्त केले .
शहापूर तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूर प्रांताधिकारी जयश्री ठाकरे, शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर, तहसीलदार विकास बिरादार, आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती. गलांडे, हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ अनिता यांनी आपत्तीच्या वेळी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अंत्यत गरजेचा असल्याचे सांगत ठाणे जिल्ह्यातील 7 तहसील कार्यालयांतर्गत आपदामित्र व सखी यांची नेमणूक करून त्यांना 12 दिवसांची ट्रेंनिग देखील देत असल्याचे सांगत आपत्ती ही विविध प्रकारची असल्याचे सांगितले . वातावरणात होणारे बदल , साथरोग , ईमारत दुर्घटना अशा विविध आपत्ती मध्ये गावपातळीवर स्थानिक एकत्र आले तर प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन पोहचण्याआधी अनेकांचे जीव वाचू शकणार असल्याचे सांगितले .
यावेळी महसूल सप्ताह निमित्त शहापूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणारे श्रमजीवी संघटनेचे दशरथ भालके, प्रकाश खोडका, कोतवाल प्रभाकर थोरात, जीवरक्षक ग्रुपचे समीर चौधरी व त्यांचे कार्यकर्ते, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर महानगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी - कर्मचारी, फायरमन, यांचा आपत्तीच्या काळात केलेल्या मदातकार्याबद्दल प्रशस्तीपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहापूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी, शिपाई यांचा देखील गौरव करण्यात आला .
ndrf , tdrf यांचा विशेष गौरव
दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्घटनेतील मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर केलेल्या ndrf चे योगेश शर्मा, tdrf चे सचिन दुबे यांच्या पथकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ndrf चे योगेश शर्मा यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना दुर्घटनेस्थळी मृतदेहाचे शोध घेताना त्यांच्या पथकातील लावली या श्वानाने कशा प्रकारे मृतदेह शोधून काढले याचं घटनाक्रम सांगितलं. लाईव्ह डिटेक्टर, मोबाईल रिंग, 15 फूट खोल असलेल्या सिमेंटच्या ढिगाऱ्यातून मृतदेह कसे शोधून बाहेर आणले याचं उदाहरण दिले .
महसूल सप्ताहात काय कामे होणार
3 ऑगस्ट हा संपूर्ण महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा होत असताना यांचा महसूल सप्ताह म्हणून साजरा होत आहे. या सप्ताहमध्ये सात - बारा व 8 अ चे शेतकऱ्यांना वाटप, 2023 मध्ये घरांची झालेली पडझड यांना नुकसान भरपाई देणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतांचे, घरांचे, मयत व्यक्ती, पशुधन यांचे नुकसान , जातीचे दाखले, अधिवास दाखले, यासारखे दाखले लाभार्थ्यांना देणे, पंचायत समितीमधील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे .