कुडे येथील जनजीवन मिशन योजनेचे काम संथगतीने...
तळा : भारत सरकारने हर घर जल या संकल्पनेच्या माध्यमातून सन 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण भागातील कुटुबांना नळ कनेक्शन च्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन योजना सुरू केली. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे कामे चालू आहेत. त्यापैकी तळा तालुक्यातील मौजे कुडे येथे सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. गेल्या वर्षी या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. उद्या 2024 उजाडेल पण कुडे जल जीवन मिशन योजनेचे पाणी अद्याप घरा घरात पोचेलेच नाही.
या योजनेचे काम अद्याप 30% सुध्दा झालेले नाही. गेल्या पंधरा दिवसा पूर्वी लेणीच्या पायथ्याशी पाण्याची टाकी बांधण्याचे काम चालू करण्यात आले. पण टाकी साठी फक्त तळभाग बांधल्यानंतर त्या नवीन बांधकामांवर पाणी सुध्दा मारण्यात आला नाही. त्यामुळे नवीन केलेल्या बांधकामाला वरून भेगा पडल्याचे चित्र आहे. योजनेसाठी टाकीपासून वापरण्यात आलेले काळे प्लास्टिकचे 63mm चे पाईप सुद्धा वरचेवर टाकण्यात आले आहे. वरचेवर टाकण्यात आलेले काळे प्लास्टिक चे पाईप किती वर्ष टिकतील हा नागरिकांसमोर प्रश्न आहे. बांधकामाचा दर्जा, स्टीलचा दर्जा, पाईपचा दर्जा याविषयी संबंधित विभागाने, संबंधित प्रशासनाने पाहणी करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करून जर पुर्ण करावी.