संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी-आ. संजय कुटे
भगवंता चोरे प्रतिनिधी
सोनाळा शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणत भाजपा आ. डॉ. संजय कुटे यांनी विकासासाठी कात टाकली आहे. संग्रामपूर तालुक्यातील प्रश्नांना मार्गी लावत 'दे दणादण' या प्रमाणे निधीचा वर्षाव सुरु केला आहे. यामुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आलेवाडी व अरकचेरी प्रकल्पांना शासनाने अखेर रुपये १००० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सातपुड्यातील शेतकऱ्यांना हे नववर्ष गिफ्ट मिळाले आहे. आ. डॉ. संजय कुटे यांनी गेल्या २ वर्षापासून सतत केलेल्या विशेष प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेद्र फडणवीस यांच्या उपास्थितीत गुरुवार २८ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात नियामक मंडळाची ८४ वी सभा पार पडली. यावेळी जळगाव जामोद मतदार संघाचे आ.डॉ. संजय कुटे यांनी मांडलेल्या जिगाव, आलेवाडी व अरकचेरी प्रकल्पाचे सर्व कामे मार्गी लागले आहेत. यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाच्या सातपुड्यातील सोनाळा येथील अरकचेरी बृहत ल. पा योजना या प्रकल्पाकरिता ६६४ कोटी तर आलेवाडी बृहत ल.पा योजना या प्रकल्पाकरिता ३२८ कोटी अशा दोन्ही प्रकल्पांना एकूण १००० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सायखेड येथील गट क्र.३५० व ३५१ या जमिनीवरील बाधित घरांचे मुल्यांकन करून कास्तकारांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी ७५ लक्ष रुपयांच्या निधीची मान्यता नियामक मंडळाकडून देण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प, आलेवाडी व अरकचेरी लघु सिंचन प्रकल्पाकरिता १२२० कोटी रुपयांच्या १४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्यामुळे लाभित व बाधित शेतकऱ्यांचे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागल्याने जळगाव जामोद संग्रामपूर व नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने आ. डॉ. संजय कुटे यांनी समाधान व्यक्त केले आहे.