अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही-तहसीलदार वाघ
अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयास शेतकर्यांचा घेरावो
( श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील अग्रीम पीक विम्याची 25 % रक्कम तसेच अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शनिवारपर्यंत भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांसह सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ नंतर तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक व माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी दिला आहे शेतकऱ्यांना चार दिवसात नुकसान भरपाईची रक्कम अदा होईल, यासाठी शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले. अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे, अग्रीम पीक विम्याची २५ % रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अरुण पाटील नाईक व माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयास घेरावो घालून निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. कानडे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी व आवश्यक ती पूर्तता केली आहे, तरीदेखील अद्याप तालुक्यातील बेलापूर,खानापूर, भामाठाण, नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मुठेवाडगाव गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया देखील अनुदान प्राप्त झालेले नाही. तहसीलदार श्रीरामपूर व कृषी विभागीय अधिकारी श्रीरामपूर आणि संबंधित कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी वारंवार हेलपाटे मारत आहेत. मागील तीन महिन्यांपासून अनुदानाअभावी नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. यासाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आतापार्यान्र चार वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र दरवेळी प्रशासनाकडून लेखी आश्वासने देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. आता शेतकर्यांची सहनशीलता संपली आहे.
अशाच प्रकारे तालुक्यात पावसाने सलग ४६ दिवसांपेक्षा अधिक खंड दिला. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी एक रूपया भरून नविन पीक विमा योजनेअंतर्गत पिक विमा उतरविला. तथापि अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अग्रीम पीक विम्याची २५ % रक्कम प्राप्त झाली नाही. गेल्या आठवड्यात तालुक्यात आवकाळी पाऊस झाल्याने कष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे, अग्रीम पीक विम्यातून देवळाली प्रवरा मंडल वगळण्यात आले असल्याने या मंडळातील शेतकरी त्यापासून वंचित राहिले आहेत.देवळालीप्रवरा मंडळाचा त्यात समावेश करण्यात यावा, तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व सततच्या पावसाची १७ हजार ५० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना केवळ ७ हजार रुपयांप्रमाणे रक्कम मंजूर झाली आहे.इतर तालुक्यांप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना १७ हजार ५० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे, येत्या शनिवारपर्यंत पिक विम्यासह अनुदानाची रक्कम शेतकर्यांना मिळाली नाही तर सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ नंतर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह बैठा सत्याग्रह करण्यात येईल, हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटतील असे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अशोक कानडे यांनी दिला.
यावेळी अनेक शेतकर्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अनुदान मिळाले नाही तर शेतकरी तहसील कार्यालयासमोर रोगर घेऊन तसेच पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी अरुण पटील नाईक, विष्णुपंत खंडागळे, प्रविण काळे, अमोल आदिक, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अजिंक्य उडे, हरिभाऊ बनसोडे, बाळासाहेब दिघे यांनी चर्चेत सहभाग घेतला. अनुदानाची रक्कम वाटपाची प्रकिया सुरु असून हि रक्कम वाटपास लगेचच सुरुवात होईल, संपूर्ण शेतकऱ्यांना चार दिवसात नुकसान भरपाईची रक्कम अदा होईल, यासाठी शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी स्पष्ट केले.
यावेळी सतीश बोर्डे,रमेश आव्हाड, आबा पवार, आशिष शिंदे, बाळासाहेब तनपुरे, दिपक कदम, कलीम कुरेशी, अस्लम सय्यद, चंद्रसेन लांडे,अनिल देशमुख,सुनील कवडे, योगेश आदिक, अनिल दांगट, संदीप दांगट, निलेश कवडे,पोपट गायकवाड, अरुण कवडे, सुरेश घोडके,करीम शाह,आप्पासाहेब आदिक,सुभाष दंगट,प्रकाश पानसरे, सतीश गवारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.